Pune : ‘लाखी बाग’ तंत्र वापराचे मिळाले ‘फळ’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीताफळाच्या

Pune : ‘लाखी बाग’ तंत्र वापराचे मिळाले ‘फळ’

सासवड : हवामान कसेही असो.. पावसाळ्यात अतिवृष्टी होवो.. बाजारभाव कमी - अधिक होवो.... या प्रतिकूल परिस्थितीवर लिलया मात करत योग्य नियोजन, चिकाटी तसेच प्रयोगशीलतेच्या जोरावर युवा शेतकरी मुरलीधर पंढरीनाथ झेंडे (रा. दिवे, ता.पुरंदर) हे सीताफळाच्या उत्पादनातून दरवर्षी ४ ते ४.५ लाख रुपये नफा मिळवितात. त्यांनी सीताफळाची बाग विकसित करून यंदा खर्च जाऊन ५.१५ लाख रुपयांचा नफा मिळविण्याचा नवा विक्रम केला आहे. कोकणातील दापोली कृषी विद्यापीठाने एक एकरात लाख रुपये देणारी ‘लाखी बाग’ तंत्र विकसित केले. मात्र, झेंडे यांनी कुटुंबीयांच्या मदतीने एक एकरात सीताफळाची फायदा देणारी बाग विकसित केली. ती एका एकरात केवळ एकाच हंगामात खर्च जाऊनही पाच लाख रुपये निव्वळ नफा देणारी ठरली आहे.

दोन झाडांत १६ फुटांचे अंतर

कृषी शास्त्रानुसार पीक व्यवस्थापन

दरवर्षी छाटणीमुळे रोग - कीड निघून जाते

छाटणीनंतर बहर काळात आवश्यक फवारण्या

शेणखत, गांडूळखत, कोंबडखतावर भर

झाडनिहाय २५ किलो सेंद्रिय व गरजेनुसार रासायनिक खत

फेब्रुवारीत पाणी देऊन आगाप उन्हाळी बहर धरला जातो

जूनच्या प्रारंभापासून उन्हाळी फळे व पुढे ऑगस्टअखेर ऑक्टोबरअखेर पावसाळी फळे

उन्हाळ्यात नेमके पाणी कमी पडते, त्यातून ३० लाख व

१० लाख लिटर्सची दोन शेततळी केली

क्रेटला ४,७५० रुपये बाजारभाव

सीताफळाला क्रेटमागे ३०० ते १००० रुपये भाव आहे. मुरलीधर झेंडे यांचा हंगाम ऑक्टोबरअखेर संपला. पण तत्पूर्वी त्यांनी एक दिवस नंबर एक सीताफळाच्या क्रेटला (२५ ते ३० किलो) खाली पानांची गादी न करता चांगली फळे घातली. त्यामुळे त्यांना क्रेटला ४,७५० रुपये भाव मिळाला. यापूर्वीचे रेकॉर्ड ३,६०० रुपयांच्या पुढे नव्हतेच.

शेतीमध्ये कोणत्याही पिकाबाबत किंवा फळ पिकाबाबत पीकनिहाय नियोजन केले पाहिजे. ते करताना पिकात विविधता हवी. त्याशिवाय उत्पादित शेतीमाल गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आवश्यक कृषी शास्त्रीय नियमांचा वापर झाला पाहिजे. पाण्याचे बँक खात्याप्रमाणे नियोजन असायला हवे आणि सर्वात महत्त्वाचे लहरी बाजारभावातला तुमच्याकडे पर्याय असायला हवा.

- मुरलीधर झेंडे, शेतकरी

योग्य नियोजन करून जमीन कसली तर लाख, दोन लाखांचे उत्पन्न मुरलीधर झेंडे यांच्यासारखे कितीतरी वाढू शकते. त्यासाठीच राज्याचे सहसंचालक सुनील बोरकर यांच्या प्रयत्नाने प्रत्येक गावांत चार-पाच शेतकरी निवडून सेंद्रिय व इतर शेती बहरण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

- सूरज जाधव, तालुका कृषी अधिकारी, पुरंदर

सीताफळ हे फळपीक नीट नियोजन केले तर चांगला नफा देऊ शकते. मात्र ज्याच्याकडे पाणी उपलब्ध असेल त्यानेच उन्हाळी बहार धरावा. अन्यथा पावसाळी बहर धरावा. छाटणी, दोन झाडातील अधिक अंतर, उन्हाळी बहरात आंतरपीक बाजरी, ठिबक सिंचन... यावर भर द्यावा. म्हणजे किफायतशीर फळबाग होते.

- डॉ. प्रदीप दळवे,अंजीर सीताफळ संशोधन केंद्र, जाधववाडी-दिवे (ता. पुरंदर)