

पुणे, ता. १९ ः गणरायाच्या दर्शनासाठी आणि विविध गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी शनिवारी पुणेकरांसह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवार आणि रविवारची जोडून आलेली सुटी तसेच गौरीचे विसर्जन झाल्याने शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या परिसरात सकाळपासूनच भाविकांची वर्दळ वाढली होती. सायंकाळनंतर गर्दीचा ओघ आणखी वाढला. शहरातील मध्यवर्ती भागासह प्रमुख गणेश मंडळांच्या परिसरात गणेशभक्तांची मोठी उपस्थिती होती.
मानाचे गणपती आणि प्रमुख मंडळांसह शहरातील विविध गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई तसेच धार्मिक आणि सामाजिक विषयांवर साकारलेले देखावे पाहण्यासाठी नागरिक कुटुंबीयांसह बाहेर पडले होते.
गणेशोत्सवातील उत्साहामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. गणरायाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेले होते. मंडळांच्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी परिसराला वेगळेच स्वरूप आले होते.
गर्दीचे नियोजन करण्यासाठी विविध गणेश मंडळांच्या परिसरात स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. भाविकांना दर्शन घेता यावे आणि देखावे पाहताना गैरसोय होऊ नये, यासाठी मंडळांकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांकडूनही प्रमुख मंडळे आणि गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीसाठी काही प्रमुख मार्ग बंद करण्यात आले होते. तसेच काही मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आल्याने शनिवारी शहरातील अनेक भागांत वाहतूक कोंडी झाली. मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते, चौक आणि गणेश मंडळांच्या परिसरात वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक संथ झाली. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भाविकांची सुरक्षितता आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.