

पुणे, ता. १५ : शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक पोलिसांनी अनावश्यक ठिकाणी बॅरिकेड्स उभारून रस्ते सरसकट बंद केले आहेत. या नियोजनशून्य कारभारामुळे वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. गणेशोत्सवात दर्शनासाठी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची रस्त्यांवर पायपीट सुरू असताना, दुसरीकडे राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींच्या वाहनांचे ताफे भाविकांच्या गर्दीत घुसविले जात आहेत. त्यामुळे हा गणेशोत्सव नेमका सर्वसामान्य भाविकांचा आहे की राजकीय नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनाचा? असा संतप्त सवाल पुणेकर उपस्थित करत आहेत.
शहर वाहतूक पोलिसांनी पेठांसह मध्यभागाकडे येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी बॅरिकेड्सचे तट उभे केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्त्याला जोडणाऱ्या काही गल्ल्या बॅरिकेड्स लावून बंद केल्या आहेत. पेठांमधील प्रमुख मंडळांच्या गणरायाच्या दर्शनासाठी भाविक तासनतास रांगेत उभे असतानाच राजकीय नेत्यांच्या वाहनांचा ताफा नेताना भाविकांना धक्काबुक्कीही केली जात आहे. आता तर दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढणार आहे. अशा गर्दीत चेंगराचेंगरी झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
रस्ते केले सरसकट बंद
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर शनिवारवाडा ते बुधवार पेठ परिसर बॅरिकेड्स लावून पूर्णपणे बंद केला आहे. स्थानिक रहिवासी आणि दुचाकीस्वारांना स्वतःच्या भागात जाण्यासही मज्जाव केला जात आहे. त्यामुळे कसबा पेठ आणि परिसरातील स्थानिक रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शनिवारवाड्यासमोर लावलेल्या बॅरिकेड्समुळे लाल महालच्या दिशेने दुचाकीस्वारांना जाता येत नाही. या ठिकाणी बॅरिकेड्सच्या विळख्यामुळे जवळच्या रुग्णालयांत ये-जा करणाऱ्या रुग्णवाहिकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.
सरसकट बॅरिकेडिंग नको
बाजीराव रस्त्यावर विश्रामबागवाड्याजवळ बॅरिकेड्स लावल्याने रस्त्याची रुंदी निम्म्यावर आली आहे. परिणामी, काही मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना अडकून पडावे लागत आहे. पदपथांवरही अडथळे असल्याने पादचाऱ्यांना चालणेही अवघड झाले आहे. पोलिसांनी मनमानी पद्धतीने सरसकट बॅरिकेडिंगचा फेरविचार करून दुचाकीस्वार, पादचारी आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
पार्किंगची व्यवस्था
सार्वजनिक गणेश मंडळांच्या ‘श्रीं’च्या दर्शनासाठी येणाऱ्या वाहनचालकांना पार्किंगची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला कोठेही अस्ताव्यस्त वाहने लावली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीन भर पडत आहे. याकडेही वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
या उपाययोजना गरजेच्या
- शनिवारवाड्यासमोरील बॅरिकेड्स हटवून लाल महालापर्यंत वाहनांना प्रवेश द्यावा.
- गर्दीच्या मुख्य रस्त्यांवर नेत्यांच्या मोठ्या ताफ्यांऐवजी केवळ मोजकी वाहने बाहेरच्या चौकांपर्यंतच सोडावीत.
- रुग्णालयांनजीकच्या मार्गांवरील बॅरिकेड्स हटवून अत्यावश्यक सेवांसाठी स्वतंत्र आपत्कालीन मार्ग ठेवावा.
- पेठांमधील नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या वाहनांसाठी विशेष पास किंवा क्यूआर कोड देऊन त्यांची अडवणूक थांबवावी.
तुमचे मत मांडा...
शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक पोलिसांनी अनावश्यक ठिकाणी बॅरिकेड्स उभारून रस्ते सरसकट बंद केले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊन वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. याबाबत तुमचे मत मांडा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.