

पुणे, ता. १६ ः गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्यासुरक्षिततेसोबतच स्थानिक नागरिकांची गैरसोय टाळण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. गणेशोत्सवात सरसकट रस्ते बंद केल्यामुळे स्थानिक नागरिक, रुग्णवाहिका आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाने मंडळांच्या सोयींऐवजी पुणेकरांच्या सोयींना आणि सुरक्षेला प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी पुणेकरांनी केली आहे.
मध्यवर्ती भागातील बॅरिकेडिंग आणि व्हीआयपी ताफ्यांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर संतप्त प्रतिक्रिया देत पुणेकरांनी आपल्या तीव्र अडचणी मांडल्या. उत्सवादरम्यान संपूर्ण रस्ता बंद करण्याऐवजी किमान एक मार्ग वाहतुकीसाठी सुरू ठेवावा, अशी मागणी करत, अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून प्रशासनाने चुकीचे धोरण त्वरित सुधारावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
पुणेकर म्हणतात...
गणेशोत्सवातील वाहतूक व्यवस्था चोख असणे आवश्यक आहे; मात्र काही ठिकाणी अनावश्यक अडथळे उभारून रस्ते बंद करणे योग्य नाही. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घ्यावी. विविध विषयांवर बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई केली जाते; मात्र त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली, याचीही माहिती सार्वजनिक करावी.
- विश्वास बोकील
गणेशोत्सवापूर्वी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलिसांच्या बैठका होतात. मात्र, मध्यवस्तीतील स्थानिक रहिवाशांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी स्वतंत्र बैठक होत नाही. पोलिसांनी स्थानिक नागरिकांसोबतही बैठक घेऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्यास वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही ठोस उपाययोजना निश्चितच करता येतील.
- प्रदीप वाव्हळ
उत्सव हा भाविकांचा आणि सर्वसामान्यांचा आहे. त्यामुळे रस्ते बंद करून नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकवण्याऐवजी व्यवस्थेचा फेरविचार करणे आवश्यक आहे. लाखो भाविक दर्शनासाठी येत असताना प्रशासनाने व्हीआयपी हालचालींपेक्षा भाविकांची सुरक्षितता, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि सामान्य नागरिकांची गैरसोय टाळणे याला प्राधान्य द्यावे. उत्सव भक्तीचा असावा; सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा नाही.
- प्रतीक भोसले
गणेशोत्सवासाठी पुण्यासह बाहेरगावांहून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. शहरात ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावल्यामुळे वाहतूक मंदावते. बॅरिकेड्सचा अतिरेक करण्याऐवजी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी गर्दी नियंत्रणावर लक्ष द्यावे. नेत्यांची वाहने आली की बॅरिकेड्स हटवले जातात. पोलिसांना जनतेची सेवा करण्यासाठी बंदोबस्त देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी सर्वांसाठी समान पद्धतीने व्यवस्था राबवावी.
- मनोहर जोशी
मध्यवर्ती भागातील बॅरिकेडिंगमुळे नागरिकांना घरापर्यंत पोहोचणेही अवघड होत आहे. या दहा दिवसांत विशेषतः सायंकाळच्या वेळी वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर होतो. ठिकठिकाणी पोलिस किंवा बंदोबस्तावरील कर्मचारी ठेवून गर्दीचे नियमन करता येऊ शकते. रस्ते अडवून चौकाचौकांत कार्यक्रम करण्याऐवजी मैदाने किंवा मोकळ्या जागांचा वापर करावा. उत्सव साजरा करावा; मात्र तो शिस्तबद्ध पद्धतीने व्हावा.
- सिद्धार्थ बेंद्रे
गणेश मंडळांच्या मोठ्या मांडव आणि सजावटीच्या स्पर्धेमुळे नागरिकांना त्रास होऊ नये. मंडळांच्या सोयीबरोबरच परिसरातील नागरिकांच्या वाहतूक व्यवस्थेचाही विचार करणे आवश्यक आहे. उत्सवाचे नियोजन करताना आधी नागरिकांची सोय आणि त्यानंतर मंडळांच्या गरजा यांचा विचार व्हायला हवा.
- शोभा पितळे
गणेशोत्सव भाविकांसाठी आहे आणि लोकप्रतिनिधीही त्याचा भाग आहेत. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना ज्या वाहतूक नियमांना सामोरे जावे लागते, त्याच नियमांचा विचार लोकप्रतिनिधींच्या हालचालींसाठीही व्हायला हवा. नेत्यांच्या वाहनांसाठी रस्ते बंद करणे किंवा विशेष व्यवस्था करणे आणि भाविकांना अडचणीत आणणे योग्य नाही. लोकप्रतिनिधींनीही सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे उत्सवात सहभागी होण्याचा आदर्श घालून द्यावा.
- ज्ञानेश्वर जगताप
गणेशोत्सवाच्या काळात पोलिस प्रशासन आणि महापालिकेच्या नियोजनाचा अभाव जाणवतो. सकाळच्या सत्रातील शाळा सुरू असताना रस्ते बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास उशीर होतो. रस्त्याच्या कडेलाही वाहने उभी केली जात असल्याने तेथेही कोंडी होते. बाहेरून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना स्थानिक नागरिकांच्या अडचणींची माहिती नसते. त्यामुळे पोलिस प्रशासन आणि महापालिकेने समन्वयाने योग्य नियोजन करावे.
- एक नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.