‘आव्वाज कुणाचा’ जरा सांभाळा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sound system

पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न नक्की असेल.

‘आव्वाज कुणाचा’ जरा सांभाळा!

पुणे - पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न नक्की असेल. विसर्जन मिरवणुकीमध्ये जास्त वेळ खंड पडू नये किंवा रेंगाळू नये याकडे पोलिसांचे विशेष लक्ष असेल, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी सांगितले. तसेच स्पीकरबाबत, आवाजाच्या मर्यादेच्या उल्लंघनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे आवश्‍यक आहे, नागरिकांची तक्रार आल्यास कडक कारवाई केली जाईल, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.

विसर्जन मिरवणूक सोहळ्यातील बंदोबस्ताची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर. राजा उपस्थित होते. कोरोनामुळे विसर्जन मिरवणुक झाली नव्हती. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदाचा गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने पार पडला. अनंत चतुर्दशी दिवशी (ता. ९) शुक्रवारी सकाळी दहा वाजता प्रथेप्रमाणे महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मुख्य विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होईल. विसर्जन मिरवणुक शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी चोख बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.

गुप्ता म्हणाले, ‘विसर्जन मिरवणुकीत रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. आवाजाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन मंडळांनी करावे. उच्च क्षमतेचे स्पीकर किंवा आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडल्यास आणि नागरीकांनी तक्रार आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. विसर्जन मिरवणूक लवकर आटोपण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मिरवणुकीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्वरित कारवाई केली जाईल. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणांवर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दागिने, मोबाईल हिसकावणे, छेड काढणे असे प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची पथके गस्त घालणार आहेत.

पोलिस बंदोबस्ताची वैशिष्ट्ये

  • विसर्जन मिरवणुकीचे पोलिसांकडून ‘ड्रोन’द्वारे चित्रीकरण

  • विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

  • गर्दीच्या ठिकाणी वृद्ध, महिला, बालकांवर विशेष लक्ष

  • चोरी, छेडछाड टाळण्यासाठी व टवाळखोरांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष पथके सक्रिय

  • विसर्जन मार्गावर नागरिकांसाठी मदत केंद्र

इथे साधा संपर्क

  • संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास त्वरित संपर्क साधा - ११२ ( पोलिस नियंत्रण कक्ष)

  • अग्निशामक दल - १०१

Web Title: Pune Ganpati Visarjan Miravnuk Police Sound Speaker Control

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..