कचरा कोंडीवरून महापालिकेत रणकंदन

कचरा कोंडीवरून महापालिकेत रणकंदन
Published on

पुणे, ता. १८ : शहरात वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने सार्वजनिक ठिकाणे आणि कचरा हस्तांतरण केंद्रांवर कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. यावरून महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. दरम्यान, कचरा नैसर्गिकरीत्या साचलेला नसून, तो जाणीवपूर्वक साठवला जात असल्याचा गंभीर आरोपही सभागृहात करण्यात आला.
भाजपचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी कचरा समस्येचा मुद्दा उपस्थित करताना, अनेक तक्रारी करूनही प्रभागातील कचरा उचलला जात नसल्याचे सांगितले. नगरसेविका वासंती जाधव म्हणाल्या, “कोथरूडमध्ये गेल्या आठ दिवसांपासून कचरा उचलला जात नाही. अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.”
विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम यांनी कचरा संकलन केंद्रांवर पाच ते सहा दिवस कचरा साचून राहत असल्याकडे लक्ष वेधले. “गाड्या कमी आहेत की प्रकल्प बंद आहेत, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली. प्रशांत जगताप यांनी उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पासाठी महापालिकेकडे आवश्यक परवानगी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. “राज्यात सर्वाधिक टिपिंग शुल्क देऊनही शहर स्वच्छ राहत नाही. काही लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांच्या निविदांना लाभ मिळावा, यासाठी हा प्रकार सुरू आहे,” असे ते म्हणाले.
दिलीप वेडे पाटील, राजाभाऊ लायगुडे, पायल तुपे, दत्ता बहिरट, गणेश कल्याणकर, महेश वाबळे, योगेश मुळीक, सुरेखा कवडे, अश्विनी लांडगे, पुनीत जोशी, नीलेश आल्हाट, कोमल नवले आणि अरुण राजवाडे यांनीही कचरा समस्येबाबत विविध मुद्दे मांडले. दरम्यान, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सभेतील चर्चा थांबवून सभा तहकूब करण्यात आली.

७०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
अरविंद शिंदे यांनी, “५०० टन क्षमतेच्या कचरा प्रकल्पाची निविदा विशिष्ट ठेकेदाराला मिळावी, यासाठी जाणीवपूर्वक परिस्थिती निर्माण केली जात आहे. यात ७०० कोटी रुपयांचा घोटाळा असून, कचरा माफिया शहरातील कचरा उचलत नाहीत,” असा आरोप केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com