गीतेमुळे व्यवहारातील निष्काम कर्मयोग शिकलो - आशिष कुमार चौहान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aashish Kumar Chauhan

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था येथे आयोजित ‘भग्वतगितेतील व्यवहारचातुर्य’ या विषयावर आशिष कुमार चौहान बोलत होते.

गीतेमुळे व्यवहारातील निष्काम कर्मयोग शिकलो - आशिष कुमार चौहान

पुणे - गीतेचे तत्वज्ञान हे दैनंदिन जीवनातील व्यवहारचातुर्य आहे. फळाची अपेक्षा न करता व्यावहारिक जीवनातील निष्काम कर्मयोग मी भग्वतगितेतून शिकलो, असे मत मुंबई स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान यांनी व्यक्त केले.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था येथे आयोजित ‘भग्वतगितेतील व्यवहारचातुर्य’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी पिनॅकल इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुधीर मेहता, रामसुख ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक प्रल्हाद राठी, सेवा इन्फोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज पोचट आणि विवेक स्पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहणेरकर उपस्थित होते. व्यवहारिक जीवन आणि भग्वतगीतेचे तत्त्वज्ञानाची सांगड चौहान यांनी उलगडून सांगितली. बालपणीच रोजच्या जगण्यातच गीतेचा परिचय झाल्याचे चौहान सांगतात. ते म्हणाले, ‘‘साधारण उतार वयाला लागल्यावर गीतेचा अभ्यास करण्याची आपली मानसिकता आहे.

पण खऱ्या अर्थाने रोजच्या जगण्यात गीतेचे तत्वज्ञान उपयोगी पडते. गिता ही व्यवस्थापनाचा एक उत्तम ग्रंथ आहे. ज्यातून कसे जगावे आणि कसे काम करावे हे शिकता येते.’’ उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तर देताना चौहान यांनी त्यांच्या जगण्यातील गीतेचे महत्त्व विशद केले. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता, आपण आपले काम केले. तर निश्चितच यश मिळते, पण त्याचबरोबर तुमच्या कामाने तुमचे व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण सिद्ध होते, असे चौहान म्हणाले.

चौहान म्हणाले...

- केवळ तुमचा हुद्दा किंवा काम म्हणजे तुम्ही नाही. त्या पलीकडेही तुमचे व्यक्तित्व असते

- भग्वतगीता हे माझ्यासाठी व्यवस्थापनशास्राचे उत्तम दस्तऐवज

- वैयक्तिक हित बाजूला ठेवून केलेले काम म्हणजे निष्काम कर्मयोग

- इच्छा आणि महत्त्वाकांक्षेपासून यश पूर्णतः भिन्न आहे. त्याला काळाची मर्यादा असते

- जीवनाच्या रंगमंचावरील भूमिका म्हणून आयुष्यातील जबाबदाऱ्यांकडे पाहिले, तर अहंकार वाढीस लागत नाही

- रोजच्या जगण्यातच आपल्या मनामध्ये कायम महाभारतातील अर्जुन-कृष्ण संवादाचा प्रसंग उद्भवतो

टॅग्स :pune