Pune : देशी वंशाच्या गायींचे जनुकीय क्रमनिर्धारण पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cow

Pune : देशी वंशाच्या गायींचे जनुकीय क्रमनिर्धारण पूर्ण

पुणे- देशी वंशाच्या चार गायींचे प्रथमच जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, भोपाळच्या (आयसर, भोपाळ) संशोधकांनी कासरगोड ड्वार्फ, कासरगोड कपिला, वेचूर आणि ओंगोल या गायींची आनुवंशिक संरचना जगासमोर ठेवली आहे.

प्रकाशनपूर्व शोधपत्रिका ‘बायोआर्काईव्ह’मध्ये नुकतेच हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. डॉ. विनीत शर्मा यांच्या नेतृत्वात अभिषेक चक्रवर्ती, मनोहर बिश्त, डॉ. रितुजा सक्सेना, श्रुती महाजन आणि डॉ. जॉबी पुलक्किन यांनी हे संशोधन केले. भारतीय देशी गायींमध्ये काही विशिष्ट क्षमता असून, रोगप्रतिकारशक्ती आणि दुधातील गुणधर्मामुळे त्यांचे आयुर्वेदातील महत्त्व लपलेले नाही.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, कमी चाऱ्यात, उष्ण वातावरणात राहण्याची भारतीय गायींची क्षमतांचा अभ्यास करण्यात आला आहे. जनुकीय क्रमनिर्धारण झाल्यामुळे विशिष्ट जातीतील गाईंचे वैशिष्ट्ये समजून घेण्यास अधिक मदत होणार आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वांत छोटी गाईंचा वंश असलेल्या ‘वेचूर’चेही जनुकीय क्रमनिर्धारण पूर्ण करण्यात आले आहे.

  • काय आहेत फायदे?

  • - देशी गायींचे अधिक निरोगी आणि सशक्त प्रजोत्पादन वाढविता येईल

  • - दूध उत्पादनाबरोबरच देशी गायींच्या उपचार आणि संगोपनासाठी विशेष प्रयत्न करता येईल

  • - इतर वंशाच्या गायींसोबत जनुकीय आधारावर तुलनात्मक अभ्यास करता येईल

  • - इतर देशी गायींच्या जनुकीय क्रमनिर्धारणास मदत होईल

  • - देशी गायींच्या आनुवंशिक विविधतेचे संरक्षण करता येईल

  • - देशी गायींच्या माध्यमातून दूध उत्पादकांचे उत्पन्न वाढविता येईल

जनुकीय क्रमनिर्धारण म्हणजे काय?

सजीवांच्या आनुवंशिक घटकांचे एकक म्हणजे जनुके! ही पेशींच्या केंद्रकातील गुणसूत्रांवर असतात आणि ती सजीवांची आनुवंशिक लक्षणे निश्चित करतात. विशिष्ट जनुके गुणसूत्राच्या विशिष्ट भागावर असतात.

एक गुणसूत्र म्हणजे डीएनए (डीऑक्सिरिबो-न्यूक्लिइक आम्ल) याचा एक रेणू असतो. ‘डीएनए’चा रेणू हजारो लहान रासायनिक एककांचा बनलेला असतो. या एककांना न्यूक्लिओटाइड म्हणतात. जनुकीय क्रमनिर्धारणात (जिनोम सीक्वेन्सिंग) ‘डीएनए’चे प्रमुख घटक असलेल्या चार प्रमुख रेणूंची क्रमवारी तपासली जाते.

पाश्चिमात्य देशांतील गायींच्या तुलनेत भारतीय वंशाच्या गायींमध्ये जनुकीय भिन्नता आढळते. उष्णकटिबंधीय परिस्थितीत राहण्यासाठी अनुकूल असलेल्या या गायींचा शास्त्रीय अभ्यास गरजेचा असून, जनुकीय क्रमनिर्धारणामुळे या संबंधीच्या संशोधनाला निश्चितच चालना मिळणार आहे.

- डॉ. विनीत शर्मा, प्राणिशास्त्रज्ञ, आयसर, भोपाळ

टॅग्स :Pune NewsCow