पुणेकरांना केवळ 1 हजार 'एमएलडी' पाणी 

पुणेकरांना केवळ 1 हजार 'एमएलडी' पाणी 

पुणे : गळती रोखल्यास दीडशे "एमएलडी' पाण्याची बचत होईल आणि त्यामुळे पुणेकरांना पुरेसे पाणी पुरविणे शक्‍य होईल, हा महापालिका आयुक्तांचा दावा पाणीकपात लागू झाल्यानंतर चार दिवसांतच फोल ठरला आहे. संपूर्ण शहराला पुरेशा दाबाने पाणी देण्याची योजना फसली असून, पेठांसह बहुतांशी भागांत दीड-दोन तासही पाणी येत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 

पाणीगळती रोखण्याच्या उपाययोजना न केल्याने 150 दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणी वाया जात असून, परिणामी पुणेकरांपर्यंत जेमतेम एक हजार "एमएलडी' इतकेच पाणी पोचत आहे. त्यामुळेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. दुसरीकडे, सर्वत्र सुरळित पाणीपुरवठा होत असल्याचा दावा महापालिका करीत आहे. शहराला याआधी रोज 1 हजार 350 "एमएलडी' पाणी मिळत होते. कालवा समितीने कपात केल्याने सध्या शहरासाठी 1 हजार 150 "एमएलडी' पाणी उचलण्यात येत आहे. मात्र, त्यापैकी साधारणत: 150 "एमएलडी' पाण्याची गळती होत असल्याचे पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले आहे. यामुळे प्रत्यक्षात पुणेकरांसाठी एक हजार "एमएलडी'पेक्षाही कमी पाणी पोचत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
गळती रोखण्यासाठी उपाययोजनाच नाहीत 
महापालिकेचे जलकेंद्र, भूमिगत जलवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याच्या तक्रारी आहेत. गेली अनेक वर्षे गळती सुरू असून, ती रोखण्यासाठी पावले उचलण्यात आली नाहीत. मुळात, नेमकी कुठे आणि किती प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे, याची नेमकी माहिती पाणीपुरवठा विभागाकडे नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात जेव्हा पाणीकपातीचा निर्णय झाला, तेव्हा गळती पूर्णपणे रोखण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले होते. त्यावर कार्यवाही न झाल्याने पुणेकरांना ऐन सणासुदीत पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. 

पेठांमध्ये अपुरा पाणीपुरवठा 
प्रामुख्याने सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठेसह डेक्कन, विधी महाविद्यालय रस्ता, घोले रस्ता परिसरातील रहिवाशांना अपुरे पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. शिवाजीनगर परिसरातील पाणीपुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नाही. 

सर्व भागांत वेळापत्रकाप्रमाणे पुरेसे पाणी सोडण्यात येत आहे. ज्या परिसरातून तक्रारी येत आहेत, तेथील अडचणी जाणून पाणीपुरवठा सुरळित करण्यात येत आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यात आल्या असून, समान पाणी देण्यात येत आहे. 
- प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा, महापालिका 

शहराला पाणीपुरवठा 
एकूण - 1,150 एमएलडी 
गळती - 150 एमएलडी 
प्रत्यक्ष - 1,000 एमएलडी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com