
पुणे : सोन्याच्या भाव वाढीची घोडदौड आता आणखी तेजीत आली असून प्रति दहा ग्रॅम भावाचा ८० पासून ९० हजार रुपयांचा टप्पा सोन्याने अवघ्या दोन महिन्यांत पार केला आहे. सध्या सोन्याने उच्चांकी गाठली असून २४ कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा भाव ९० हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन आणि गुंतवणुकीचा वाढता कल यामुळे सोन्याचा भाव उच्चांकी स्तरावर पोहोचला आहेत. मात्र, वाढलेल्या किमतीनंतरही पुण्यात सोन्याची मागणी वाढली असून गुंतवणुकीसाठी आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा कायम आहे.