सोन्याचा भाव तेजीत; खरेदीला झळाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोन्याची खरेदी वाढल्याने सराफ बाजाराला झळाळी आली असून भाव देखील तेजीत आहे.

Gold Rate Increase : सोन्याचा भाव तेजीत; खरेदीला झळाळी

पुणे - गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोन्याची खरेदी वाढल्याने सराफ बाजाराला झळाळी आली असून भाव देखील तेजीत आहे. शनिवारी आणि रविवारी (ता. १८-१९) सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चांगल्या प्रमाणात खरेदी झाली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरेदीत २० ते २५ टक्के वाढ होर्इल, असा अंदाज या क्षेत्रात तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

गेल्या दहा दिवसांत २४ कॅरेट सोने ५५ हजार ८५० (१० ग्रॅम) वरून ६० हजार रुपयांच्या घरात पोचले आहे. तर २२ कॅरेटचा भाव ५१ हजार ३८२ वरून ५५ हजार २०० रुपये झाला आहे. या सर्वांत चांदीच्या भावाने देखील उसळी घेतली आहे. चांदी ६४ हजार ३५० रुपये किलोवरून ६८ हजार ३०० रुपये झाली आहे.

याबाबत पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांत दागिन्यांच्या खरेदीसाठी चांगली गर्दी वाढली आहे. नागरिक सोन्यात गुंतवणुक करीत असल्याचे यातून स्पष्ट होते. त्यामुळे यंदा सोन्याची खरेदी २० ते २५ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे. शार्ट टर्म गुंतवणुकीसाठी सध्या अनेकांची पसंती सोन्याला आहे. त्यामुळे दर वाढले तरी खरेदी देखील वाढतच आहे.

फेब्रुवारी व मार्च महिन्यातील सोन्या-चांदीचे भाव

तारीख - सोने २४ कॅरेट- सोने २२ कॅरेट - चांदी (प्रतिकिलो)

१ फेब्रुवारी- ५७,८२३ - ५४,१०१ - ६९,७००

११ फेब्रुवारी - ५७,५७० - ५३,५८० - ६७,४५०

२० फेब्रुवारी- ५६,९४४- ५२,९६७ - ६६,७००

२८ फेब्रुवारी- ५६,२०५- ५२,१४२- ६३,९००

१ मार्च - ५५,८५० - ५१,३८२ - ६४,३५०

१० मार्च - ५५,४४० - ५१,००५ - ६१,३५०

२० मार्च - ६०,०००- ५५,२०० - ६८,३००

भावात चढउतार :

गेल्या दीड महिन्यांत सोने चांदीच्या भावात सातत्याने चढउतार होत आहे. एक फेब्रुवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ५७ हजार ८२३ होता. तर २२ कॅरेट सोने ५४ हजार रुपये प्रति १० ग्रॅम होते. तर चांदी ६९ हजार ७०० रुपये किलो होती. त्यानंतर भावात घड झाली होती. मात्र आता पुन्हा भाव वाढू लागले आहेत. भाव एका ठरावीक मर्यादेपर्यंत वाढून स्थिर होण्याची शक्यता आहे.