
Pune : उद्यापासून ग्राहकांना मिळणार सहा अंकी 'एचयुआयडी' क्रमांक असणारे शुध्द सोने
सोमेश्वरनगर : उद्यापासून सोन्याच्या दागिन्यांवर सहा अंकी 'एचयुआयडी' (हॉलमार्क युनिक आयडेंटीफिकेशन) क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना १ एप्रिलपासून खात्रीशीर सोने मिळणार असून फसवणूक टळणार आहे. दरम्यान, ज्या व्यवसायिकांनी जुना स्टॉक जाहीर केला होता अशांना मात्र केंद्रीय व्यापार मंत्रालयाकडून 'एचयुआयडी'साठी किंचित शिथिलता देत दोन ते तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
सोन्याबाबत ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी व शुध्दतेच्या खात्रीसाठी केंद्रसरकारने १ जुलै २०२१ पासून सोन्याच्या दागिन्यांवर चार अंकी हॉलमार्किंगची योजना सुरू केली. ४३ हजार १५३ व्यवसायिकांनी 'बीआयएस' (भारतीय मानक ब्युरो) यांच्याकडे हॉलमार्किंगसाठी नोंदणीही केली. १० कोटी दागिन्यांवर हॉलमार्किंग करण्यात आले होते.
मात्र त्यांच्यापैकी १६ हजार २४३ सराफांकडे अजूनही चार अंकी हॉलमार्किंगचा साठा शिल्लक होता असे त्यांनी स्टॉक घोषित केल्याने समोर आले आहे. परिणामी या सराफांमध्ये चार अंकी हॉलमार्किंगचे दागिन्यांचे काय करायचे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. ग्राहकांनीही १ एप्रिलपासून जुन्या हॉलमार्किंगचे अथवा हॉलमार्किंग नसलेले दागिने घ्यायचे की नाही याचा संभ्रम होता.
दरम्यान, व्यापार मंत्रालयाच्या ताज्या निर्णयानुसार सदर स्टॉक घोषित केलेल्या सराफांना सोन्यावरील चार अंकी हॉलमार्किंग हटवून त्या जागी संबंधित सरकारमान्य केंद्रातून सहा अंकी एचयुआयडी मोफत टाकून दिला जाणार आहे. किंवा सदर चार अंकी हॉलमार्किंगचे दागिने दोन ते तीन महिने विकता येणार आहेत,
अशी माहिती इंडियन बिलियन ज्वेलर्स असोसिएशनचे राज्य समन्वयक किरण आळंदीकर यांनी दिली. तर ग्राहकांकडे असलेल्या जुन्या सोन्यासाठी मात्र कुठलेही बंधन नाही. ते क्रमांक नसलेले सोनेदेखील कधीही विकू, बदलू शकतात. एचयुआयडीअभावी मूल्यही कमी होणार नाही. हवे असल्यास एचयुआयडी क्रमांकही घेता येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एचयुआयडी सेंटर वाढविण्याची मागणी
ग्राहकहिताची योजना असल्याने केंद्रसरकारच्या एचयुआयडीचे आम्ही स्वागतच करत आहोत. एचयुआयडीसाठी २८८ सेंटर आहेत. ज्या जिल्ह्यात सेंटर नाही त्यांना एचयुआयडीचे बंधन नाही आणि ज्या जिल्ह्यात सेंटर तिथे मात्र बंधन हा विरोधाभास दूर करावा. तसेच सेंटरवरील ताणही कमी करावा. त्यासाठी आमची देशात किमान नऊशे सेंटरची मागणी आहे. संबंधित पोर्टलही बंद, हँग असते त्यात सुधारणा कराव्यात, अशी मागणी आळंदीकर यांनी केली.