Pune: समाविष्ट मतदारांचे फॉर्म ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाविष्ट मतदारांचे फॉर्म ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्याची मागणी

पुणे : समाविष्ट मतदारांचे फॉर्म ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्याची मागणी

उंड्री : हांडेवाडी, पिसोळी, होळकरवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, उरुळी देवाची, महंमदवाडी या गावातील नागरिकांना नवीन मतदार नोंदणी, नावात बदल, पत्ता बदल करण्यासाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये यावे लागत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया या गावांतील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अशोक न्हावले, धनंजय हांडे यांनी सांगितले की, हडपसर क्षेत्रीय कार्यालय समाविष्ट केलेल्या गावांपासून दूर असून, मतदान प्रक्रियेतील वेगवेगळ्या कारणांसाठी नागरिकांना वेळ, पैसा खर्च करूनही वेळेत काम न झाल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे मतदान फॉर्म जमा करण्यासाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत त्या त्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मतदान फॉर्म घेण्यासाठी नवीन केंद्र सुरू करून नागरिकांची अडचण दूर करावी. या गावांतील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोणतेही कामकाज होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ही प्रक्रिया करणे सोयीचे होईल, असेही येथील नागरिकांनी सांगितले.

सहआयुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांमधील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये २१ दिवसांचे तात्पुरते केंद्र उभे केले जाईल. नागरिकांनी तेथील केंद्रामध्ये मतदान फॉर्म जमा करून सहकार्य करावे. काही अडचणी असल्यास तातडीने संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तहसीलदार बालाजी सोमवंशी म्हणाले की, नागरिकांनी शासकीय कार्यालयात मतदान प्रक्रियेसाठीचे फॉर्म जमा करावेत. जमा झालेले फॉर्म छाननी करून त्या त्या विधानसभा मतदारसंघात पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top