पुणे ग्रोथ हबचा आराखडा केंद्राकडे

पुणे ग्रोथ हबचा आराखडा केंद्राकडे
Published on: 

सकाळ वृत्तेसवा
पुणे, ता. ३० : पुणे ग्रोथ हबचा बृहद् विकास आराखडा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीमार्फत नोव्हेंबरअखेर केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून पाच हजार कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.

पुणे महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास करून पुण्याला जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रोथ हब’च्या विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी आढावा घेतला. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली. यावेळी माजी मुख्य सचिव तथा सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

नीती आयोगाच्या पुढाकाराने देशातील मुंबई, सुरत, वाराणसी आणि विशाखापट्टणम् या शहरांमध्ये ‘ग्रोथ हब’ उपक्रम राबविण्यात येत असून, त्यामध्ये पुण्याचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी मागील वर्षी ऑगस्टमध्ये महाराष्ट्र शासन, नीती आयोग आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. पुणे महानगर प्रदेशातील औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, शिक्षण, विमान वाहतूक, आरोग्य, कृषी आणि संशोधन अशा विविध क्षेत्रांतील विकासाच्या संधी विचारात घेऊन हा आराखडा तयार करण्यात येत आहे. सर्व संबंधित विभागांच्या सूचना आणि प्रस्तावांचा विचार करून विकासाची दिशा निश्चित केली जात आहे.

पुण्यात मोठी गुंतवणूक अपेक्षित
पुढील दहा वर्षांच्या कालावधीत या उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक अपेक्षित आहे. या गुंतवणुकीतून पुणे महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा, उद्योग आणि विविध क्षेत्रांचा विकास साधून पुण्याला जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे, असे सुनेत्रा पवार यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.