

Gunhe Vrutta
Sakal
बांधकाम प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने पावणेनऊ कोटींची फसवणूक
पुणे : वेगवेगळ्या बांधकाम प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा आणि सदनिका देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची आठ कोटी ८१ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी एका व्यावसायिकाने (वय ५७, रा. रेंज हिल्स रस्ता, शिवाजीनगर) यांनी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ड्रीम्स कॉर्पोरेशनचे संचालक रमेश घिसुलाल मेहता, उमेश शशिकांत अंबर्डेकर, हसमुख प्रकाश बांठिया आणि हितेश सुभाष लोंढा या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी व्यावसायिक आणि त्यांच्या आईने आरोपींच्या बँकेच्या खात्यात वेळोवेळी ही मोठी रक्कम गुंतवली होती. गुंतवणूक केलेल्या रक्कमेच्या बदल्यात सदनिका देण्याचे सामंजस्य पत्र करूनही आरोपींनी प्रत्यक्षात सदनिका आणि परतावा दिला नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक निरीक्षक कल्याणी पाडोळे करत आहेत.