Hawkers Committee Election : पुणे पथारी निवडणुकीत प्रशासनाचा गोंधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

voting

महापालिकेतर्फे फेरिवाला समितीतील ८ सदस्य निवडण्यासाठी निवडणूक जाहीर केली आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यापासूनच अतिक्रमण विभागाच्या कारभारावर टीका होत आहे.

Hawkers Committee Election : पुणे पथारी निवडणुकीत प्रशासनाचा गोंधळ

पुणे - पुणे महापालिकेतर्फे फेरिवाला समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. आज उमेदवारी अर्ज पाहून त्यांच्यावर अक्षेप घेण्यासाठीचा दिवस होता. पण निवडणूक निर्णय अधिकारी दिवसभर कार्यालयात नसल्याने आक्षेप घेता आला नाही असा आरोप उमेदवारांनी केला आहे. मात्र, प्रशासनाने अधिकारी कार्यालयातच होते असा दावा केला आहे.

महापालिकेतर्फे फेरिवाला समितीतील ८ सदस्य निवडण्यासाठी निवडणूक जाहीर केली आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यापासूनच अतिक्रमण विभागाच्या कारभारावर टीका होत आहे. मतदारांची नावे कमी करणे, मतदार यादीत प्रचंड चुका असणे, उमेदवारी अर्ज उपलब्ध नसणे यासह अनेक प्रकार घडले आहेत. तरीही वरिष्ठ अधिकारी याकडे कानाडोळा करत आहेत.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी संधी होती. त्यासाठी विविध प्रवर्गातील उमेदवार महापालिकेजवळील एलबीटी कार्यालयात उपस्थित होते. पण निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना इतर उमेदवारांचे अर्ज पाहता आले नाहीत. तेथील कर्मचाऱ्यांकडूनही अरेररावीची भाषा केली जात होती.

उमेदवार कविता पटेकर म्हणाल्या, ‘उमेदवारांचे अर्ज पहायला मिळावेत यासाठी सर्व उमेदवार उपस्थित होते. पण निवडणूक निर्णय अधिकारी दिवसभर आले नाहीत त्यामुळे आम्हाला अर्ज पाहता आले नाहीत. सायंकाळी पावणे सहा वाजता अधिकारी आले. तसेच याबाबत चौकशी केली असता गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला.

उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दुसरीही कामे होती. कार्यालयात अर्ज पाहण्यासाठी उपलब्ध होते, त्यांना कोणीही उडवले नाही. तसेच आज सुनावणी होणार नव्हती. कार्यालयात सर्व काही व्यवस्थित होते.