
पुणे : आरोग्य विभाग भरती पेपर फुटीप्रकरणी एकाला अटक
पुणे : आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेसाठी घेतलेल्या परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी सायबर पोलिसांनी बुधवारी एकाला अटक केली आहे. विजय प्रल्हाद मुऱ्हाडेला (वय २९, नांदी, ता. अंबड, जिल्हा. जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
फुटलेल्या पेपरच्या स्क्रीनशॅाट्समध्ये त्याचे नाव होते. या प्रकरणाचा तपास करीत पोलिसांनी त्याचा माग घेतला. तांत्रिक विश्लेषणातून त्याला औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता रवींद्र कारेगावकर (वय ५१) यांनी फिर्याद दिली. त्यावरुन अनोळखी व्यक्तींविरुद्ध फसवणूक, महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विर्निदीष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: बारामतीमध्ये चिंकारा शिकार प्रकरणी चौघांना अटक
सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली होती. या प्रकाराद्वारे शासनाची व परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली होती. त्यानुसार दाखल गुन्ह्यात मुऱ्हाडे अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीत मुऱ्हाडे याचे नाव समोर आले होते. अटक केल्यानंतर तो दुसऱ्या व्यक्तींचे नावे सांगत आहे. या गुन्ह्यातील आरोपींची साखळी शोधण्याचा तपास सध्या सुरू आहे. आरोपीला हे पेपर कोणी पुरवले, त्याने ते कोणाला पाठवले, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे. हा सर्व कट कसा करण्यात आला याची माहिती घेतली जात आहे.
डी. एस. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे
Web Title: Pune Health Department Recruitment Fraud Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..