

पुणे, ता. १८ : शहराच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या महापालिकेच्या तीन दवाखान्यांचे, तसेच चार प्रसूतिगृहांचा महापालिकेकडून कायापालट केला जाणार आहे. संबंधित रुग्णालयांत अद्ययावत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासह प्रसूतिगृहांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. त्यासाठी येणाऱ्या ४९ कोटी ८२ लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. तसेच, स्वच्छतेसाठीच्या जनजागृती कार्यक्रमासाठी येणाऱ्या १३ कोटी रुपयांच्या खर्चालाही मंजुरी दिली.
बोपोडी येथील संजय गांधी दवाखान्याचे सर्वसाधारण रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी १४ कोटी ८१ लाख ७५ हजार रुपये इतका खर्च केला जाणार आहे. येथे अतिदक्षता कक्ष, ऑपरेशन थिएटरसह विविध वैद्यकीय विभाग विकसित केले जाणार आहेत. येरवडा येथील राजीव गांधी दवाखाना आणि धायरीतील मुरलीधर लायगुडे दवाखान्यांचेही रुग्णालयांत रूपांतर केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका १२ कोटी ४० लाख रुपये खर्च करणार आहे. दरम्यान, मित्रमंडळ चौकातील राजमाता जिजाऊ, कोथरूडमधील जयाबाई सुतार, मुंढवा येथील सखाराम कोद्रे आणि बोपोडीतील द्रौपदाबाई खेडेकर या चार प्रसूतिगृहांचे आधुनिकीकरण करण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे. संबंधित कामासाठी २२ कोटी ६० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
दवाखाने, प्रसूतिगृहांचे अद्ययावतीकरण व आधुनिकीकरणाच्या कामांत वैद्यकीय उपकरणे, यंत्रसामग्री, प्रसूतिगृह कक्ष, मॅटर्निटी वॉर्ड आणि ऑपरेशन थिएटर अद्ययावत करण्यात येणार आहेत. या सर्व कामांसाठी ४९ कोटी ८२ लाख रुपये खर्च येणार आहे. या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी दिली, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
स्वच्छतेसाठीच्या जनजागृतीसाठी १३ कोटी खर्च
शहरातील स्वच्छताविषयक जनजागृती मोहिमांसाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने १३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला. त्याद्वारे माहिती, शिक्षण आणि संप्रेषण उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी एका संस्थेची निवड केली. त्यांना १२ महिन्यांच्या कालावधीसाठी काम दिले जाणार आहे. आवश्यकतेनुसार या कामाची मुदत आणखी एक वर्षाने वाढविली जाणार असल्याचे भिमाले यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन स्थापनेला मान्यता
नैसर्गिक आपत्ती आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दुर्घटनांमधील बाधितांना आर्थिक मदत होण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन केले जाणार आहे. त्यासंबंधीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. तसेच, अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या वारसांना दोन लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व ५० हजार रुपये आणि रुग्णालयातील उपचारांसाठी दहा हजार रुपयांपर्यंतची मदत देण्याचे धोरण निश्चित केल्याचे भिमाले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.