पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील तिघांना जामीन

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील तिघांना जामीन

Published on

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील तिघांना जामीन

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २ ः पुण्यातील पोर्श हिट अँड रन प्रकरणातील तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. २०२४ मध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोन मोटारसायकलवरून जाणाऱ्या संगणक अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्श गाडी चालवत या दोघांना उडवले होते.
रक्ताचे नमुने बदलण्याच्या कटात सामील असलेल्या आशिष मित्तल, आदित्य सूद तसेच अमर गायकवाड यांना न्या. बी. व्ही. नागरत्न आणि न्या. उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला. गाडीतील दोन अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या आरोपींना अटक केली होती. पुराव्यांमध्ये फेरफार करणे, फसवणूक असे आरोप यांच्याविरोधात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने गत डिसेंबर महिन्यात या आरोपींसह विशाल अग्रवाल (मोटार चालवणाऱ्या मुलाचा पिता), अरुणकुमार सिंह, अश्फाक मकानदार, डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलोनोर यांना जामीन देण्यास नकार दिला होता.
ससून रुग्णालयातील डॉ. तावरे आणि डॉ. हलोनोर यांनी लाच घेत रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप आहे. मकानदार आणि गायकवाड यांनी आरोपींना डॉक्टरांशी संधान साधण्यास मदत केली होती. तर जामिनासाठी अर्ज केलेल्या मित्तल आणि सूद यांचे रक्ताचे नमुने अदलाबदलीसाठी वापरण्यात आले होते. गाडीतील अल्पवयीन आरोपी दारूच्या नशेत नव्हते, हे दर्शवण्यासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देखील आरोपींनी तयार केले होते. मित्तल, सूद आणि गायकवाड हे गत १८ महिन्यांपासून तुरुंगात बंद आहेत, त्यामुळे अटीशर्थींसह त्यांना जामीन दिला जात असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले.

‘पालक जबाबदार’
पुण्यासारख्या घटनांसाठी पालकांना जबाबदार धरले पाहिजे. काही पालक आपल्या मुलांना आवरू शकत नाहीत. नशेत गाडी चालवणे ही वेगळी गोष्ट आहे, पण गाडीच्या चाव्या अल्पवयीन मुलांना का दिल्या जातात, हे समजत नाही, असे खंडपीठाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com