शूटिंगसाठी पुणे ‘हॉट डेस्टिनेशन’

प्रणिता मारणे 
सोमवार, 15 एप्रिल 2019

पुणे - पूर्वी चित्रपटांमध्ये पुणे शहरातील एखादा भाग दिसल्यावर सिनेमागृहातही प्रेक्षक बोट दाखवून एकमेकांना सांगायचे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून साधारण संपूर्ण चित्रपटच शहरात शूट केल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे शूटिंगसाठी पुणे सध्या हॉट डेस्टिनेशन होत आहे.

पुणे - पूर्वी चित्रपटांमध्ये पुणे शहरातील एखादा भाग दिसल्यावर सिनेमागृहातही प्रेक्षक बोट दाखवून एकमेकांना सांगायचे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून साधारण संपूर्ण चित्रपटच शहरात शूट केल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे शूटिंगसाठी पुणे सध्या हॉट डेस्टिनेशन होत आहे.

काही वर्षांपूर्वी चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात होणार म्हटले की लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता, अप्रूप असायचे. कारण, पुण्यात चित्रीकरण फार क्वचित किंवा त्याला काही पार्श्‍वभूमी असेल तरच व्हायचे. सध्या सलिल कुलकर्णी यांचा प्रदर्शित होणारा ‘वेडिंगचा शिनेमा’ याचे चित्रीकरण पुण्यात झाले आहे. तसेच ‘गुलाबजाम’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘भाई ः व्यक्ती की वल्ली’ अशा अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पुण्यात झाले होते. त्यामुळे १० पैकी साधारण ६ चित्रपटांचे शूटिंग पुण्यात होत आहे. त्याचबरोबर दिग्दर्शक अजय नाईक यांच्या ‘सतरंगी रे’ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या पुण्यातच सुरू आहे.  

येत्या काळात सुरू होणाऱ्या चित्रपटाचे शूटिंगही पुण्यातच होणार आहे. पुण्यात शूटिंगसाठी सारसबाग,  विश्रामबागवाडा अशी ठरलेली ठिकाणे असायची. परंतु, त्याचाही आवाका वाढला असून पौड फाटा, चांदणी चौक, बावधन, भूगाव या पट्ट्यांमध्येही शूटिंग व्हायला लागले आहे. काही महिन्यांपर्यंत चित्रपटसृष्टीची शूटिंगबाबतची सगळी सूत्रे मुंबईमधून हलायची. त्यामुळे ती सर्व पुण्याच्या ताब्यात येण्याची अनेक कारणे आहेत. गिरीश कुलकर्णी, नागराज मंजुळे यांसारख्या दिग्दर्शकांचे ऑफिसही पुण्यातच असते. चित्रपटाचे वाचन, इन्प्रोव्हायजेशन्स यासारखी चित्रपटांची पूर्वतयारीही पुण्यातच व्हायची. त्यानंतर शूटिंग मुंबईत व्हायचे. परंतु, ती व्याख्या आता बदलत असून, संपूर्ण शूटिंगलाच पुण्याला प्राधान्य मिळत आहे. 

पुण्यामध्ये अधिक कलाकार राहतात. त्यामुळे कलाकारांना ते जास्त सोयीचे होते. तसेच, त्यांच्या राहण्याचा खर्चही निर्मात्यांसाठी वाचतो. तसेचस शहराचा विस्तार होत असल्याने शूटिंगसाठीही अनेक नवीन जागाही उपलब्ध होत आहेत. पुण्यात शूटिंग करणे मुंबईपेक्षा स्वस्त पडते. त्यामुळे अनेक जण त्याला प्राध्यान्य देत आहेत.
- पूनम शेंडे, निर्माती  

Web Title: Pune Hot Destination for shooting