
पुणे : पोलिसांमुळे घराचा आधार गेला; सुरेश पिंगळे यांच्या पत्नीचा आक्रोश
पुणे : "आमचे कुटुंब त्यांच्या नोकरीवरच कुटुंब अवलंबून होते. पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पती दोन महिने हेलपाटे मारत होते. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे असल्याचे सांगितले. पोलिसांकडून झालेल्या त्रासामुळेच त्यांचा मृत्यु झाला. आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाहीत'' अशा शब्दात पोलिसांवर थेट आरोप करीत पोलीस आयुक्तालयासमोर जाळून घेणाऱ्या सुरेश पिंगळे यांच्या पत्नीने त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
हेही वाचा: प्रमाणपत्रासाठी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यु
खासगी कंपनीमध्ये नोकरी मिळालेल्या सुरेश पिंगळे यांच्याकडून चारित्र्य पडताळणीसाठी मागील दोन महिन्यांपासून पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हेलपाटे मारत होते. तरीही वेगवेगळी कारणे सांगून पोलिसांकडून त्यांना प्रमाणपत्र देण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. या सगळ्या प्रकाराला कंटाळल्याने पिंगळे यांनी बुधवारी दुपारी पोलीस आयुक्तालयासमोर पेटवून घेतले होते. खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यु झाला. त्यावेळी त्यांचे भाऊ संजय पिंगळे, पत्नी शामल पिंगळे व नातेवाईक रुग्णालयात उपस्थित होते. जाळून घेण्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी पिंगळे यांचा जबाब नोंदविला नाही, दोन पोलिसांनीच त्यांना ताटकळत ठेवले होते. त्यांच्यावर आता कारवाई करावी, त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले. मुले लहान असून शिक्षण घेत आहेत. पोलीस आता या कुटुंबाला नुकसान भरपाई देणार आहे का? अशी मागणी त्यांचा भाऊ संजय पिंगळे यांनी केली.
'त्या' कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करा
"नोकरीसाठी लागणाऱ्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी पती दोन महिन्यांपासून पोलीस आयुक्तालयात हेलपाटे मारत होते. त्यांना प्रत्येक वेळी वेगळी कारणे सांगून माघारी पाठविले जात होते. 1994 व 2006 मध्ये त्यांच्या नावावर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सांगत होते. माझे पती कुटुंब सांभाळून सामाजीक कार्य करीत होते. 2006 मध्ये ते बोरीवली येथे होते. असे असतानाही त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे सांगून प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. या प्रकरणामध्ये दोन महिला पोलिसांनी त्यांना त्रास दिला, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करा. आम्हाला न्याय द्या, आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाहीत, त्यांनी जिथे जाळून घेतले, तिथेच पोलिसांनी त्यांचे काहीही करावे, अशी भावना शामल पिंगळे यांनी व्यक्त केली.
आता मुलांना वडील हरवले म्हणून उत्तर देऊ का?
पिंगळे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने अक्षरशः हंबरडा फोडला. पिंगळे यांना तीन मुले आहेत. मोठी मुलगी प्रसुतीसाठी घरी आली आहे, 14 वर्षांची मुलगी व आठ वर्षांचा मुलगा शिक्षण घेत आहेत. मुलांना घरी गेल्यावर काय उत्तरे देऊ, आता तुमचे वडील हरवले आहेत, असे सांगू का? असा उद्विग्न सवालही त्यांनी उपस्थित केला.
Web Title: Pune House Was Destroyed By The Police Suresh Pingale Wife Outcry
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..