

पुणे, ता. १२ : महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स आणि बॅनरवर कारवाई सुरू असली, तरी शहरातील अनधिकृत जाहिरातबाजीला आळा बसलेला नाही. रस्ते, चौक, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणी राजकीय कार्यक्रम, वाढदिवस, जयंती तसेच धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात फ्लेक्स-बॅनर लावले जात आहेत. त्यामुळे शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत असून, पादचाऱ्यांसह वाहनचालकांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
शहरातील अनधिकृत होर्डिंगमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होतो, हे यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांमधून स्पष्ट झाले आहे. तरीही जानेवारीपासून अनधिकृत होर्डिंगवरील कारवाई थंडावली होती. ‘सकाळ’ने या प्रश्नाकडे लक्ष वेधल्यानंतर महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने कारवाईला सुरुवात केली. सप्टेंबरमध्ये शहराच्या विविध भागांतील ४२ अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले. त्याचबरोबर अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर हटविण्याची मोहीमही सुरू करण्यात आली.
महापालिकेची कारवाई सुरू असतानाही सार्वजनिक मालमत्ता, रस्त्यांच्या कडेला, चौकांमध्ये आणि पदपथांवर विनापरवानगी फ्लेक्स-बॅनर लावले जात आहेत. विशेषतः वाहतूक सिग्नलच्या परिसरात लावण्यात येणाऱ्या फ्लेक्समुळे वाहनचालकांना अडथळे निर्माण होतात.
अनधिकृत फ्लेक्स-बॅनर हटविण्यापुरतीच कारवाई मर्यादित राहत असल्याने पुन्हा जाहिरातबाजी केली जात आहे. संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणे आणि गरजेनुसार गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. अन्यथा महापालिकेची कारवाई सुरू असतानाही शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजी कायम राहण्याची शक्यता आहे.
अनधिकृत होर्डिंगवर मागील दीड महिन्यापासून कडक कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर फ्लेक्स, बॅनर, फलक यांच्याविरुद्धही कारवाई केली जात आहे. कारवाईनंतरही अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर, फलक लागल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.
- संदीप कदम, प्रमुख, आकाशचिन्ह विभाग, महापालिका
आकाशचिन्ह विभागाकडून सप्टेंबर २०२६ महिन्यात झालेली कारवाई
अनधिकृत होर्डिंग : ४२
बोर्ड/बॅनर/फ्लेक्स : ५७५३
पोस्टर्स : १८५९
झेंडे : १५८१
किऑस्क : ७७८
पहाड : २७९
इतर : ११८
एकूण : १०,४१०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.