
Impression Event : तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात रंगला ‘इम्प्रेशन्स’
पुणे - देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांचा सळसळता उत्साह आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिभेच्या दर्शनाने सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा ‘इम्प्रेशन्स’ हा आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव पार पडला. ‘प्रवाह - एक कलात्मक प्रवास’ अशी थीम असलेल्या या महोत्सवातील सर्व चोवीस स्पर्धांना भरघोस प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला महोत्सव अशी ओळख असलेल्या ‘इम्प्रेशन्स’मध्ये यंदा तब्बल वीस हजार युवक-युवतींनी सहभाग नोंदवला.
महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध मराठी अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या हस्ते व विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मुकुल सुतवणे यांच्या उपस्थितीत २२ डिसेंबरला झाले. यावेळी गणेशपुरे यांनी महोत्सवाच्या या सातव्या आवृत्तीसाठी शुभेच्छा देत आपल्या खास विनोदी शैलीत उपस्थितांना प्रोत्साहन दिले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘डूडली-डू’ आणि ‘कलरस्प्लॅश’ सारख्या कला स्पर्धांसह ‘सावनी’, ‘नृत्यांगना’ आणि ‘व्हर्स-ए-टाइल’ अशा अनेक स्पर्धांची एलिमिनेशन फेरी पार पडली. महोत्सवातील ‘फूड झोन’ देखील लक्ष वेधून घेतले. अमनदीप सिंग यांचा कथाकथनाचा कार्यक्रम ‘हाऊसफुल्ल’ गर्दीत पार पडला.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘गेम ऑफ शेड्स’, ‘कॉमिकिंग’, ‘स्ट्रीट फॉरवर्ड’, ‘सो-ड्युएट’ आदी स्पर्धा पार पडल्या. ‘हाय करंट’मधील प्रतिभावान बँडच्या सादरीकरणाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.
सायंकाळी ‘मल्लिका-ए-ठुमरी’ या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, प्राध्यापक सदस्य आणि विद्यार्थी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिवसाची सांगता प्रसिद्ध बँड ‘सबाली’च्या सादरीकरणाने झाली. अखेरच्या दिवशी ‘पूना-०५’, ‘सावनी’, ‘सो-डुएट’ आणि ‘अंदाज-ए-बयान’ या कार्यक्रमांची अंतिम फेरी पार पडली. त्यानंतर विद्यापीठातील ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप समारंभ पार पडला. तर, महोत्सवाचा समारोप प्रसिद्ध पार्श्वगायिका शाल्मली खोलगडे यांच्या संगीत मैफिलीने झाला. त्यांच्या या मैफिलीला अभूतपूर्व प्रतिसाद दिलेल्या तरुणाईने गाण्यांवर ताल धरत महोत्सवाची दिमाखदार सांगता केली. या महोत्सवाला ट्रॅव्हल पे, बुकिटन्गो, चिंगारी अॅप, कोसोनॉस्ट्रा (गेमएजन्सी) व फ्रॉदर हे प्रायोजक, तर ‘सकाळ’ माध्यम सहयोगी म्हणून लाभले होते.