esakal | Pune : रेल्वेस्थानकावर वाढविली गस्त
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : रेल्वेस्थानकावर वाढविली गस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आतापर्यंत प्रवासी व महिलांच्या सुरक्षिततेकडे कमालीचे दुर्लक्ष करणारे लोहमार्ग पोलिस अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर खडबडून जागे झाले. त्यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात गस्त वाढविण्याबरोबरच विनाकारण फिरणाऱ्यांसह बेकायदेशीर रिक्षाचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या हजारो महिलांवर मद्यपी, चोरटे व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा सातत्याने सामना करण्याची वेळ येत होती. शहरात शिक्षण, नोकरीसाठी येणाऱ्या विद्यार्थिनी, नोकरदार महिलांना हा त्रास सहन करावा लागत होता. कोरोनामुळे लोकल व रेल्वेसेवा थंडावली.

त्यामुळे या प्रश्‍नाचे गांभीर्य काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र होते. मात्र, लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर तसेच, रेल्वेसेवा हळूहळू सुरू होऊ लागल्याने हा त्रास पुन्हा एकदा सुरू झाला. परिणामी, अल्पवयीन मुलीवर बलात्कारसारखी गंभीर घटना रेल्वेस्थानक परिसरात घडली. त्यामुळे लोहमार्ग पोलिस होते कुठे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता.

हेही वाचा: Pune : आगामी निवडणुकीत सातशे केंद्रांची भर

या पार्श्‍वभूमीवर लोहमार्ग पोलिसांनी बंडगार्डन पोलिस, वाहतूक पोलिस, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या मदतीने स्थानकाच्या आवारात बेकायदेशीरपणे फिरणाऱ्या, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पन्नासहून अधिक रिक्षाचालकांवर कारवाई केली. रेल्वेस्थानकाच्या आवारातील पार्किंग व परिसरात ही कारवाई केली. त्याचबरोबर लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे पोलिसांच्या मदतीने लोहमार्ग परिसर, स्थानक परिसरात दिवसा व रात्री गस्त वाढविण्यात आली आहे. १२५ पोलिस कर्मचारी, सात अधिकारी व एक पोलिस निरीक्षक इतक्‍या पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे.

याबरोबर तपास पथकातील कर्मचाऱ्यांचेही विनाकारण फिरणारे, संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवले जात आहे. प्रवासी ये-जा करताना स्कॅनिंग केल्यानंतरच त्यांना सोडले जात आहे. याबरोबरच संपूर्ण रेल्वेस्थानक परिसरावर सीसीटीव्हीद्वारे नियंत्रण ठेवले जात असल्याची माहिती रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

नोकरीच्या निमित्ताने दररोज दौंड-पुणे असा प्रवास करावा लागतो. या प्रवासादरम्यान रेल्वे स्थानकाच्या परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपी, टवाळखोरांचा अनेकदा त्रास होतो. त्यामुळे महिला, तरुणी, विद्यार्थिनींना कायम असुरक्षित वातावरणातच प्रवास करावा लागतो. पोलिसांकडून तात्पुरती कारवाई होते. अत्याचारासारखी मोठी घटना घडण्याचीच वाट का पाहायची? त्यापूर्वीच सुरक्षित वातावरण का निर्माण होत नाही?

- स्वाती सोनवणे, नोकरदार, दौंड

loading image
go to top