
पुणे : इंदापूरमधील द्राक्षबागांना फटका
कळस : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे चिंता वाढली आहे. पावसामुळे तोडणीस आलेल्या द्राक्षाचे मणी फुटण्याचे प्रमाण (क्रॅकींग) वाढले आहे. तर फुलोऱ्यातील बागांवरही बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांचा बागांवरील औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. कळस, बिरंगुडी परिसरातील मण्यात पाणी उतरलेल्या व फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागांना सर्वाधिक फटका बसला आहे.
तालुक्याचा पश्चिम भाग द्राक्षाचे आगार म्हणून ओळखला जातो. या भागातील बोरी, बिरंगुडी लासुर्णे, काझड, शिंदेवाडी , निंबोडी, भरणेवाडी, शेळगाव, कडबनवाडी गोसावीवाडी, पिलेवाडी, रुई, व्याहळी या परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल होवून पावसाच्या कमी-अधिक प्रमाणात सरी कोसळत आहेत. त्याचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.
दरम्यान, विभागीय कृषिसहसंचालक बसवराज बिराजदार यांनी बोरी व बिरंगुडी भागातील नुकसानग्रस्स द्राक्ष बागांची पाहणी करून उपाययोजनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष भारत शिंदे, रामचंद्र शिंदे, शिवाजी शिंदे, सुभाष शिंदे, किशोर शिंदे, संदिप शिंदे आदी द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
अवकाळी पावसामुळे शेतातील सुमारे दीड एकर द्राक्ष बागेचे नुकसान झाले. बागेतील सुमारे ८०० झाडांवरील १२ टन द्राक्षाचे पूर्ण नुकसान झाले आहे. क्रॅकिंग झाल्याने द्राक्षाचे मणी बागेत पडून व दोन दिवसांत आंबट वास येण्यास सुरुवात होणार आहे. सध्याच्या बाजारभावाचा विचार करता आमचे बारा लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.
- अॅड. दयानंद सांगळे, द्राक्ष उत्पादक
Web Title: Pune Indapur Grapes Farm Rain
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..