

पुणे, ता. ९ : जलजीवन मिशनमधील उर्वरित ३९ हजार २५५ नळजोडण्या मार्चपर्यंत पूर्ण कराव्यात, तसेच अपूर्ण पाणीपुरवठा योजना मार्च २०२७ पर्यंत मार्गी लावाव्यात, असे निर्देश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी दिले. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्यासह चांदणी चौक-घोटावडे फाटा-पिरंगुट-हिंजवडी मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. वनाज-चांदणी चौक, रामवाडी-वाघोली आणि लोहगाव विमानतळ मेट्रोच्या जोडणीचा प्रकल्प अहवाल निश्चित मुदतीत मार्गी लावण्यास सांगितले.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. दूरदृश्यप्रणालीद्वारे खासदार सुप्रिया सुळे सहभागी होत्या, तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, भीमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, बाबाजी काळे, हेमंत रासने, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.
रामवाडी-वाघोली मार्गिकेच्या आराखड्याला आवश्यक मान्यता घेण्यास सांगण्यात आले. लोहगाव विमानतळ मेट्रो जोडणीचा सविस्तर प्रकल्प अहवालही निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. चांदणी चौक-घोटावडे फाटा-पिरंगुट-हिंजवडी मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचनाही मोहोळ यांनी केल्या. खासदार सुळे यांनी या मार्गाची आवश्यकता असल्याचे सांगत त्याला अनुमोदन दिले. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत उंड्री आणि फुरसुंगी परिसरातील कचऱ्याचा प्रश्न बैठकीत सुळे यांनी मांडला. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुणे महापालिका आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना मोहोळ यांनी दिल्या.
मोहोळ म्हणाले...
- वनाज-चांदणी चौक उन्नत मार्गासाठी पुणे महापालिकेची आर्थिक सहमती घ्यावी
- प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेत पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित अर्ज एका महिन्यात निकाली काढा
- स्वामित्व योजनेंतर्गत जिल्ह्यातील मोजणी पूर्ण झालेल्या गावांमध्ये सनद आणि मिळकतपत्रिकांचे वितरण पूर्ण करा
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या प्रत्येक तालुक्याला उद्दिष्ट निश्चित करून कामांना गती द्यावी
‘‘भारतनेटअंतर्गत पुणे जिल्ह्यात एक हजार ४९० कार्यरत जोडण्या आणि एक हजार ३६६ ग्राहक जोडण्या कार्यान्वित आहेत. जिल्ह्यातील सुमारे एक हजार ४०० ग्रामपंचायतींपर्यंत भारतनेट पोहोचविण्यासाठी वर्षनिहाय आणि तालुकानिहाय कालबद्ध आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायत स्तरावर भारतनेट उद्योजकांची नोंदणी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.’’
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.