

पुणे, ता. ३ : ‘‘कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या बोगद्यासाठी राज्य शासनाने ३५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. डिंभे धरणातून माणिकडोह आणि येडगाव या दोन धरणांमध्ये वाय आकाराच्या बोगद्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. १५ किलोमीटरच्या या बोगद्यासाठी महिनाभरात निविदा काढण्यात येणार असून, त्यापुढील दीड महिन्यात कामाला मंजुरी देण्यात येणार आहे,’’ अशी माहिती कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ यांनी दिली.
सध्या डिंभे धरणातून ५५ किलोमीटरच्या कालव्यातून पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दीड लाख हेक्टर शेतीसाठी सिंचन होत आहे. मात्र, कालव्याची स्थिती अत्यंत वाईट झाली असून, पाणी गळतीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळेच बोगद्याद्वारे या दोन धरणांमध्ये पाणी सोडल्यास पाण्याची बचत होऊन तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त पाणी मिळणार आहे. डिंभे धरण बांधल्यानंतर एकूण ४० टीएमसीपैकी या तीन जिल्ह्यांसाठी २१ टीएमसी पाणी सिंचनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. परंतु, गळतीमुळे २१ टीएमसीपैकी केवळ १६ टीएमसीच पाणी या शेतकऱ्यांना मिळत आहे.
त्यावर पर्याय म्हणून डिंभे धरणातून माणिकडोह व येडगाव या दोन धरणांमध्ये पाणी सोडण्यासाठी हा बोगदा तयार करण्यात येणार आहे. वाय आकाराचा १५ किलोमीटरचा हा बोगदा माणिकडोह आणि येडगाव धरणांना जोडण्यात येणार आहे. बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण २१ टीएमसी पाणी शेतकऱ्यांना वापरता येणार आहे. त्यामुळे अतिरिक्त पाच टीएमसी पाणी वाढल्याने सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
याबाबत धुमाळ म्हणाले, “या कामाची निविदा महिनाभरात काढण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल. निविदा काढल्यानंतर पुढील ४५ दिवसांमध्ये कार्यादेश देण्यात येतील. निधी मिळाल्यानंतर पुढील तीन वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे गळती कमी होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.