#PuneIssue पुलाखाली ‘अंधार’

नीलम कराळे
सोमवार, 25 जून 2018

पुणे - सातारा रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात आलेला केशवराव जेधे पूल पंचमी हॉटेल ते लक्ष्मीनारायण चित्रपटगृहदरम्यान अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला आहे. त्यातच भर आहे ती अस्वच्छतेची. पुलाखालील पदपथ तसेच सायकल ट्रॅकवर अनधिकृत पार्क केली जाणारी वाहने, वारंवार बंद असलेले सिग्नल, बीआरटीच्या कामाचा राडारोडा यामुळे या भागातील वाहतुकीचा फज्जा उडत आहे.

पुणे - सातारा रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात आलेला केशवराव जेधे पूल पंचमी हॉटेल ते लक्ष्मीनारायण चित्रपटगृहदरम्यान अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला आहे. त्यातच भर आहे ती अस्वच्छतेची. पुलाखालील पदपथ तसेच सायकल ट्रॅकवर अनधिकृत पार्क केली जाणारी वाहने, वारंवार बंद असलेले सिग्नल, बीआरटीच्या कामाचा राडारोडा यामुळे या भागातील वाहतुकीचा फज्जा उडत आहे.

या पुलामुळे लक्ष्मीनारायण ते साईबाबा मंदिरादरम्यान रस्ता पाचपदरी झाला आहे. दुहेरी पूल तसेच पुलाच्या मध्य भागातून जाणारा एक व पुलाच्या दोन्ही बाजूने जाणारे दोन (येतानाचा आणि जातानाचा) अशा एकूण पाच मार्गांवरून एकाच वेळी वाहतूक सुरू असते. यातील पुलाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रस्त्यांवर अनेक समस्या आहेत. या रस्त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र, या रस्त्यावरच वाहने अनधिकृत उभी केली जातात. याशिवाय भटकी कुत्री, शेळ्या-मेंढ्या, जुनी कपडे विकणाऱ्यांची गाठोडी, भंगार, कचरा, राडारोडा पडलेला असतो. तसेच व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण ही वेगळीच डोकेदुखी आहे. या रस्त्यांवरील पदपथ आणि सायकल ट्रॅक केव्हाच गायब झाला आहे. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या शौचालयाचीही दुरवस्था झाली आहे.

वाहनचालकांना हे सारे ‘दिव्य’ पार करीतच रस्ता पार करावा लागतो. पादचाऱ्यांची अवस्था तर याहून बिकट आहे. स्थानिक रहिवाशांनादेखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरच पंचमी हॉटेलशेजारी ‘नो पार्किंग’चा फलक आहे. मात्र, या फलकापुढेच चारचाकी आणि दुचाकी वाहने उभी केली जातात. वाहतूक पोलिसही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

या ठिकाणी असे चित्र 
 पंचमी हॉटेल ते स्वामी समर्थ मंदिर - कचरा, अनधिकृत पार्किंग, कुलूपबंद शौचालये, बीआरटी आणि ड्रेनेजच्या कामाचा राडारोडा.
 स्वामी समर्थ मंदिर ते लक्ष्मीनारायण चित्रपटगृह - खड्डे, उंच-सखल रस्ता, पुलाखाली कपड्यांची गाठोडी, शेळ्या-मेंढ्या, जुनी वाहने, कचऱ्याचे ढीग, भटकी कुत्री.

पावसाळ्यात अशा खराब रस्त्यामुळे अपघाताची शक्‍यता अधिक आहे. तसेच कचरा, शौचालयाची दुरवस्था आणि बेकायदा पार्किंग यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण 
होत आहे.
- आशा मोरे, स्थानिक रहिवासी

क्षेत्रीय कार्यालयामार्फत या रस्त्यावरील अतिक्रमणाची माहिती घेतली जाईल. येत्या दोन ते तीन दिवसांत महापालिकेकडून संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल.
- माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग.

संबंधित रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग; तसेच वाहतुकीच्या समस्येबाबत लवकरच पाहणी करून योग्य ती कार्यवाही 
केली जाईल.
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.

Web Title: pune issues bridge darkness