‘कलाग्राम’ कागदावरच!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

पु. ल. देशपांडे उद्यानात ‘दिल्ली हाट’च्या धर्तीवर होणाऱ्या ‘कलाग्राम’साठी स्मार्ट सिटीअंतर्गत एक वर्षापूर्वी निविदा काढण्यात आल्या.

पुणे - पु. ल. देशपांडे उद्यानात ‘दिल्ली हाट’च्या धर्तीवर होणाऱ्या ‘कलाग्राम’साठी स्मार्ट सिटीअंतर्गत एक वर्षापूर्वी निविदा काढण्यात आल्या. त्यानुसार काम सुरू करण्यासाठी त्याचे कार्यादेश देण्याचीही वेळ आली अन्‌ तेव्हा प्रशासनाच्या लक्षात आले, की यासाठीची आर्थिक तरतूद मिळालेली नाही. त्यामुळे चक्क प्रकल्पाकडेच डोळेझाक झाल्याचे उघड झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिका आणि स्मार्ट सिटीमधील विसंवादाचा फटका ‘कलाग्राम’सह अनेक प्रकल्पांना बसत असल्याचेही या वेळी दिसून झाले.

स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीच्या बैठकीत शहरातील प्रकल्पांचा आढावा घेण्यात येत होता. त्या वेळी कलाग्रामचा विषय निघाला. तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांनी खासदार निधीतून ७५ लाख आणि आमदार माधुरी मिसाळ यांनी आमदारांसाठीच्या विशेष निधीतून एक कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. ही रक्कम महापालिकेकडे जमा झालेली आहे. त्यामुळे प्रकल्प पुढे का सरकला नाही, अशी विचारणा आमदार मिसाळ यांनी केली. तेव्हा स्मार्ट सिटीच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल आगरवाल म्हणाल्या, ‘‘सुमारे आठ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठीची सुरुवातीची रक्कम महापालिकेने अद्याप दिलेली नाही. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही.’’ आगरवाल यांच्या वक्तव्यावर खासदार गिरीश बापट यांच्यासह सर्वच उपस्थित लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. या प्रकल्पासाठी महापालिकेने सुमारे दोन कोटी रुपयांची तरतूद २०१९-२०च्या अर्थसंकल्पात केली आहे, असे मिसाळ यांनी या वेळी दाखवून दिले. त्यावर आगरवाल यांनी महापालिकेकडून ही रक्कम तातडीने स्मार्ट सिटीकडे देण्यात येईल, असे सांगितले. एक वर्षांपूर्वी निविदा काढूनही प्रकल्प रखडल्याबद्दल या वेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.

स्मार्ट सिटी आणि महापालिका प्रशासनातील विसंवादाचा फटका प्रकल्पांना बसत आहे. आमदार, खासदार निधी महापालिकेकडे पोचला आहे, अर्थसंकल्पात तरतूद उपलब्ध आहे. म्हणजेच निधी असूनही ढिसाळ कारभारामुळे प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकत नाही, ही नक्कीच संतापजनक बाब आहे. 
- माधुरी मिसाळ, आमदार

असे असेल कलाग्राम 
सुमारे १२ एकर जागेत हे कलाग्राम साकारणार आहे. त्यात खुले प्रेक्षागृह, स्टुडिओ असतील. तसेच, हस्तकला आणि बचत गटाच्या उत्पादनांचे स्टॉल्स तेथे असतील. कलादालनाला भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी कट्टे आणि एेसपैस जागा असेल. संपूर्ण कलादालन पर्यावरणपूरक असेल. झाडे, ऊन आणि सावलीचा वापर करून पारंपरिक बैठक व्यवस्थेची रचना आराखड्यात करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune kalagram