
कोथरूडकरांच्यादृष्टीने जिव्हाळ्याच्या बनलेल्या नळ स्टॉप ते अभिनव चौक दुहेरी उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर गेले दोन महिने होत असलेल्या वाहतूक कोंडीबद्दल ‘सकाळ’च्या पुढाकाराने बुधवारी सर्व संबंधित घटकांची बैठक झाली.
कर्वे रस्त्यावरील कोंडी फोडण्यास पाऊल पडते पुढे!
पुणे - कोथरूडकरांच्यादृष्टीने जिव्हाळ्याच्या बनलेल्या नळ स्टॉप (Nalstop) ते अभिनव चौक (Abinva Chowk) दुहेरी उड्डाणपुलाच्या (Flyover) उद्घाटनानंतर गेले दोन महिने होत असलेल्या वाहतूक कोंडीबद्दल (Traffic) ‘सकाळ’च्या पुढाकाराने बुधवारी सर्व संबंधित घटकांची बैठक झाली.
पायाभूत सुविधांचा विकास होत असताना निर्माण होणाऱ्या अडचणींतून मार्ग काढण्याच्या भूमिकेतून आयोजित या बैठकीत नागरी संघटना, पुणे महापालिका प्रशासन, वाहतूक पोलिस, व्यापारी संघटना, उद्योजक, वाहतूक तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाले. सकाळी अकरा ते बारा या वेळेत आणि संध्याकाळी साधारण पाच ते रात्री आठ या वेळेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना वाहतूक कोंडी होत आहे. वाहन चालक, व्यापारी, नागरीकांना या कोंडीचा फटका बसत आहे. बैठकीसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे महाविद्यालयाने सहकार्य केले. एका रात्रीत वाहतुकीचा प्रश्न सुटण्याची व्यवहार्य शक्यता नसली, तरी कोंडी सुटण्याच्यादृष्टीने पावले उचलण्याचे बैठकीत निश्चित झाले.
नागरिकांनी सुचविलेले पर्याय
नळ स्टॉप ते कॅनॉल रस्ता या कर्वे रस्त्यावरील डावीकडे वळणाऱ्या तीनही रस्त्यांवर फक्त प्रवेश ठेवणे
केतकर रस्त्यावरून कर्वे रस्ता ओलांडणे बंद करावे. स्वातंत्र्य चौकातील सिग्नल बंद होईल
पौड रस्त्यावरील वाहतूक पुन्हा विधी महाविद्यालय रस्त्यावरून नळ स्टॉप चौकात आणावे
निसर्ग हॉटेल कडून कर्वे रस्त्यावर जाण्यासाठी जोशी रस्त्यावर बोलार्डस् लावू नये, हा रस्ता खुला ठेवला पाहिजे
बोलार्डस् लावल्यास या भागात राहणाऱ्या १० हजार नागरिकांचा कर्वे रस्त्यावर येण्यासाठी मोठा वळसा घालावा लागणार विचार करावा
केवळ मोटारीतील नागरिकांचा विचार नको तर पायी, सायकलवरून जाणाऱ्यांनाही आनंद वाटावा अशी सुविधा असावी
रेस्कॉन गल्लीचे रुंदीकरण करावे
नळ स्टॉप चौक, एसएनडीटी या भागात चालणाऱ्या नागरिकांसाठी सुविधा असली पाहिजे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पादचारी मार्ग काढू नये
शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा असली पाहिजे
नळ स्टॉप चौक ते लागू बंधू या दरम्यान वाहन बंद पडल्यास संपूर्ण रस्ता बंद होईल, त्यासाठी पर्यायी व्यवस्था करा
पीएमपीच्या बसेच उड्डाणपुलावरून न जाता त्या खालूनच जाव्यात
बसेस उड्डाणपुलावरून गेल्यास सोनल हॉल नंतर थेट दशभुजा गणपतीचा थांबा आहे. त्यामुळे या मधील प्रवाशांची गैरसोय करू नका
वाहतूक कोंडी कमी करायची असेल तर मोफत बस सेवा सुरू करा
रजपूत झोपडपट्टी येथील नदीपात्रातील रस्ता म्हात्रे पुलाशी जोडल्यास कर्वे रस्त्यावरील ताण कमी होईल
नो पार्किंगचा बोर्ड लावताना पार्किंग कुठे करायची हे पण सांगा. अशी सुविधा दिली तर नागरिक योग्य ठिकाणी गाड्या लावतील
पंचवटी येथील रस्ता, करिष्मा सोसायटी येथील उड्डाणपुलाबाबत आत्ताच सावध भूमिका घ्या
एसएनडीटी ते आठवले चौक हा रस्ता दुहेरी केल्यास नळ स्टॉप चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल
नळस्टॉप चौक येथे सायंकाळी ६ ते ८ यावेळेत कोंडी होत आहे. या दोन तासासाठी उपाययोजना केली पाहिजे
हा उड्डाणपूल नसून, एका सिग्नलसाठी तयार केलेला रॅम्प आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली असल्याने तो पाडून टाका

काय आहेत लोकांची मते
म्हात्रे पुलाला डीपी रस्ता जोडावा.
नळ स्टॉप चौकातील उड्डाणपूल चुकीच्या पद्धतीने बांधला आहे. तो तत्काळ पाडून टाकला पाहिजे.
नळ स्टॉप चौकात भुयारी मार्ग बांधावा.
पर्यावरण वादी कार्यकर्ते बरोबर चर्चा करावी. गोखले नगर व एमआयटीचा मार्ग काढावा. समस्या विचारात घेऊन लोकप्रतिनिधींनी कामे केली पाहिजेत.
पौड फाटा व बालभारती रस्ता मार्गावर भुयारी रस्ता तयार करणे.
नळ स्टॉप चौकातला उड्डाणपूल हा सावरकर उड्डाणपुलाला जोडणे आवश्यक.
नदीपात्रातील रस्ता डीपी रस्त्याला जोडावा
आठवले चौक ते एसएनडीटी गेट रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू करणे.
दुहेरी पूल खंडूजी बाबा चौक इथंपर्यंत घेऊन जाणे.
सध्याच्या उड्डाणपूल खाली पे अँड पार्क सुरू करणे.
व्यापाऱ्यांना पार्किंग हवी.
जड वाहनांसाठी वेळ निश्चित हवा.
उड्डाणपुलामुळे रस्ता अरुंद झाला आहे.तो रुंद झाला पाहिजे.
कर्वे रस्त्यांवर लावण्यात आलेले बोलार्ड काढून तिथून दुचाकी जाण्यास परवानगी द्यावी.
चक्राकार वाहतूक पद्धत हवी.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. दुचाकीची संख्या कमी करण्यासाठी महत्त्वाच्या रस्त्यावर मोफत बस सेवा जरी सुरु केली तर उद्याची गुंतवणूक ठरेल.
उड्डाणपुलामुळे बस स्टॉप स्किप करावे लागत आहे. बसस्टॉप नाहीसे झाल्याने प्रवासी प्रवासासाठी अन्य साधनांचा वापर करतात.
यांचा चर्चेत सहभाग
आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, मेधा कुलकर्णी, कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, उपाध्यक्ष अजित सांगळे, हस्तिमल चंगेडिया, कोथरूड व्यापारी असोसिएशनचे मंदार देसाई, ‘एमईएस’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, सहायक सचिव सुधीर गाडे, महापालिकेचे अतिरिक्त नगर अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला, महाराष्ट्र हौसिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष सुहास पटवर्धन, माजी नगरसेवक श्याम देशपांडे, शिवा मंत्री, ‘परिसर’चे सुजित पटवर्धन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अभ्यासिका प्रांजली देशपाडे-आगाशे, सेव्ह पुणे ट्रॅफिक फोरमचे हर्षद अभ्यंकर, बांधकाम व्यावसायिक मकरंद केळकर, डॉ. अभिजित मोरे, कर्वे रस्ता सुरक्षा समितीचे उमेश कंधारे, पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक राजेश रूपनवर, पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, वृत्तपत्र विक्रेता संघाचे सचिव अरुण निवंगुणे, यशवंत वधावने तसेच सारंग लागू, शेखर फुलंब्रीकर, सचिन धनकुडे, गौतम मोरे, शंतनू खिलारे आदी
हे उपस्थित
माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, ‘महामेट्रो’चे महासंचालक हेमंत सोनवणे, संदीप खर्डेकर, प्राचार्य डॉ. पी. बी. बुचडे, रवींद्र जोशी, पुनीत जोशी, दुष्यंत मोहोळ, सौमित्र देशमुख, कैलास नाकंते, दिलीप उंबरकर, वृत्तपत्र विक्रेते सुनील मोकर, बाळासाहेब पानगावकर, यश वधवने, कैलास नाकंते, वसंत बागल, सौरभ पटवर्धन, सुनील उन्हाळे, विश्वनाथ शिंदे, शिवाजी शेळके, राजेश गायकवाड, रोहन रोकडे, प्रा. सुहास पवार, शर्वरी वाघ, रवींद्र संघवी, जगन्नाथ हेंद्रे, बाळू दांडेकर, प्रदीप घुमरे, आर्किटेक्ट भाव्या रंगराजन, उषा रंगराजन, प्रकाश साबळे, हरीश पटेल, परीक्षित देवल, श्रीनिवास बंड, सी. एच. कदम, संदीप कुंबरे, किरण साळी.

उपस्थित करण्यात आलेले प्रश्न
दुहेरी उड्डाणपुलाचा पर्याय सुचविणाऱ्या सल्लागारांना वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होईल, याचा अंदाज आला नाही का ?
बांधताना नियमानुसार सात मीटर रस्ता ठेवण्याबाबत आश्वासन दिले, प्रत्यक्षात तीन मीटरच रस्ता शिल्लक राहिला. हा सात मीटर रस्त्याचा नियम गेला कुठे ?
अंतर्गत रस्त्यांवरील बोलार्डस्मुळे नळस्टॉप परिसरातील पाच ते दहा हजार नागरिकांची चारचाकी वाहने जाणार कुठून?
नळस्टॉप चौक ते लागू बंधू पर्यंतच्या रस्त्यात बस किंवा मोठे वाहन बंद पडल्यास वाहतूक कोंडी फोडणार कशी?
जून महिन्यात शाळा, महाविद्यालये सुरु झाल्यानंतर विद्यार्थी, पालकांसाठी बसथांब्याची सोय काय? रस्ता ओलांडायचा कसा?
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्त्यावरील पदपथच काढून टाकल्यावर पादचाऱ्यांनी चालायचे कुठून?
दुहेरी उड्डाणपुलामुळे बसथांबे स्थलांतरित करताय, पण प्रवाशांचा कोणी विचार करणार आहे का?
नदी पात्रातील रजपूत वीटभट्टी झोपडपट्टीजवळील प्रस्तावित डीपी रस्त्याला मुहूर्त केव्हा लागणार?
नदीपात्रातून महामेट्रोच्या पुलांना परवानगी मिळत असेल, तर डीपी रस्त्याला का नाही?
नदीपात्रातील डीपी रस्त्याबाबत महापालिकेने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये बाजू व्यवस्थितपणे का मांडली नाही?
विधी महाविद्यालय रस्ता आठवले चौकापर्यंत दुहेरी केल्यास स्थानिक नागरीकांनी रस्ता ओलांडायचा कसा?
शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी नळस्टॉप चौकाजवळील भुयारी मार्गाचे काम केव्हा सुरु होणार?
‘पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पा’ अंतर्गतचे मोठे पदपथ करण्याचे प्रकार थांबविणार कधी?
स्थानिक नागरीकांना येणाऱ्या अडचणींकडे महापालिका, वाहतूक पोलिस लक्ष देणार आहेत का?
मेट्रो प्रकल्पाला जोडण्यासाठी बससाठी जागा आहे का? बस वाहतुकीची व्यवस्था तीन मीटर रुंदीच्या रस्त्यावर होणार का?
आकडे बोलतात
खंडूजी बाबा चौक ते पौड फाटा चौक अंतर २.५ किलोमीटर
कर्वे रस्ता रुंदी ३० मीटर
विधी महाविद्यालय रस्ता १६ मीटर रुंदी
नळ स्टॉप चौकात बांधलेल्या उड्डाणपुलाची लांबी ५७२ मीटर
उड्डाणपुलाची रुंदी ६.१ मीटर
सध्या नळ स्टॉप चौकातून एका तासामध्ये होणारी वाहनांची वर्दळ ३५ ते ४० हजार
असा झाला खर्च
महापालिकेचे योगदान ३० कोटी रुपये
महामेट्रोने दिलेला निधी २६ कोटी रुपये
कर्वे रस्त्यावर २०२० मध्ये केलेल्या वाहतूक सर्वेक्षणानुसार खंडूजी बाबा चौक ते पौड फाटा चौक या दरम्यान गर्दीच्या वेळी ताशी १३ ते १५ हजार वाहनांची वर्दळ असते.
विधी महाविद्यालयाकडून ताशी तीन हजार वाहने नळ स्टॉप चौकाकडे धावत असतात.
सकाळची भूमिका
वेगाने वाढणाऱ्या पुणे महानगरात पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविताना सर्वसामान्य पुणेकरांचा प्राधान्याने विचार झाला पाहिजे. प्रकल्पाच्या नियोजनापासून ते उभारणीपर्यंत नागरिकांना प्राधान्य राहिले तरच प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर वापर सुयोग्य पद्धतीने होऊ शकतो. प्रकल्प झाले पाहिजेत; मात्र ते पुणेकरांच्या गरजा लक्षात घेऊन, ही भूमिका आहे. त्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरी संघटनांनी पुण्याला प्राधान्य देत एकत्र आले पाहिजे. पुणेकर म्हणून आपल्याला अशा प्रकल्पांमध्ये काही सूचना करायच्या असतील, तर आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. Email: editor.pune@esakal.com
व्हॉट्सॲप क्रमांक - ८४८४९७३६०२
Web Title: Pune Karve Road Traffic Meeting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..