Kasaba Vidhansabha Byelection : कसब्याने दिला भाजपच्या आमदारांना धोक्याचा इशारा

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा पराभव केला.
BJP
BJPesakal
Updated on
Summary

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा पराभव केला.

पुणे - भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा पराभव केला. त्यामुळे आता २०१९ मध्ये पाच हजाराच्या फरकाने भाजपने जिंकलेल्या शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला या तीन मतदारसंघातील आमदारांना धोक्याचा इशारा मिळाला आहे.

कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी १० हजार ९५० मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर विजय मिळवला. या मतदारसंघात २८ वर्षानंतर येथे भाजपचा पराभव झाला. पुणे शहरात कसब्याशिवाय कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी हे मतदारसंघ असून, तेथे सध्या भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून त्याऐवजी शिंदे फडणवीस यांचे सरकार आले. या सरकारच्या स्थापनेनंतर कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागल्याने जनतेचा कौल कोणाला आहे याची चाचपणी झाली. त्यामध्ये कसब्यात महाविकास आघाडी तर चिंचवडमध्ये तिरंगी लढतीमुळे पुन्हा भाजपच्या बाजूने जनमत दिसून आले. पण आता यानिमित्ताने आगामी विधानसभा २०२४ मधील विधानसभेकडे लक्ष लागले आहे. २०१९च्या विधानसभेच्या निकालाचे आकडेवारीचे विश्लेषण केले असता पर्वती आणि कोथरूडमधील भाजपचे आमदार सुरक्षीत असल्याचे दिसत आहे. तर शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला या मतदारसंघात धोका असल्याचे स्पष्ट होते आहे. हडपसर आणि वडगाव शेरी या दोन्ही जागा राष्ट्रवादीने पाच हजारपेक्षा कमी फरकाने जिंकल्या असल्या तरी महाविकास आघाडीमुळे त्यांना फायदा होऊ शकतो असे दिसून येत आहे.

BJP
Pune Crime : अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करुन काढले विवस्त्र फोटो; चार अल्पवयीन मुले ताब्यात

शिवसेनेची साथ अन फोडाफोडी

भाजपला २०१९ च्या निवडणुकीत शहरातील आठही मतदारसंघात भाजपला शिवसेनेची म्हणजे ठाकरे गटाची साथ होती. पण आता २०२४ ला ते विरोधात असणार आहेत. तसेच २०१९ ला शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट हे मतदारसंघ धोक्यात असल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी केली होती. शिवाजीनगरमध्ये मुकारी अलगुडे, दत्तात्रेय गायकवाड, आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कॅन्टोन्मेमध्येही सदानंद शेट्टी, सुधीर जानज्योत, रशीद शेख यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजप प्रवेश केला. या दोन्ही मतदारसंघात या ठाकरे गट आणि फोडाफोडीमुळे निसटता का होईना विजय मिळाला होता. पण आता दोन्ही मतदारसंघातील स्थिती काही प्रमाणात भाजपला पूरक नाही.

वंचितची भूमिका महत्वाची

२०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला (वंबआ) पुण्यातून चांगली मते मिळाली. यामध्ये शिवाजीनगरमध्ये १० हजार ४५४, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये १० हजार २६, खडकवासला ५हजार ९१, हडपसर ७ हजार ५७०, पर्वती ७ हजार ७३४, वडगाव शेरीत १० हजार २९८ मते मिळाली होती. तर कोथरूड मध्ये केवळ २ हजार ४२८ मत मिळाली होती, तर कसब्यात उमेदवार नव्हता. कोथरूड व कसबा वगळता वंचितला मिळालेल्या मतदानामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फटका बसला होता. वंचितने सध्या ठाकरे गटाशी युती केली असली तरी ते काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेत आहेत, चिंचवडच्या पोटनिवडणुकीतही त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत वंचितची भूमिका महत्त्वाची ठरेल.

BJP
Sanjay Raut : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीबाबत पटोलेंची भूमिका मान्य

मतदारसंघातील आकडे बोलतात

शिवाजीनगर

सिद्धार्थ शिरोळे (भाजप) - ५८७२७

दत्ता बहिरट (काँग्रेस) - ५३६०३

अनिल कुऱ्हाडे (वंबआ) - १०४५४

सुहास निम्हण (मनसे) - ५२७२

शिरोळे यांचे मताधिक्य - ५१२४

पुणे कॅन्टोन्मेंट

सुनील कांबळे (भाजप) - ५२१६०

रमेश बागवे (काँग्रेस) - ४७१४८

लक्ष्मण आरडे (वंबआ) - १००२६

हीना मोमीन (एमआयएम) -६१४२

कांबळे यांचे मताधिक्य - ५०१२

खडकवासला

भीमराव तापकीर (भाजप) - १२०५१८

सचिन दोडके (राष्ट्रवादी काँग्रेस) - ११७९२३

अप्पा आखाडे (वंबआ) - ५९३१

तापकीर यांचे मताधिक्य - २५९५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.