
Pune : कात्रजमध्ये गरजूंसाठी 'भुकेल्याचा घास'
कात्रज : शिवजयंती साजरी करायची असेल तर ती अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचा संकल्प करत कात्रजमधील कार्यसिद्धी प्रतिष्ठानने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. कार्यसिद्धी प्रतिष्ठानने दक्षिण पुणे परिसरातील गरजूंसाठी शिवजयंतीनिमित्त भुकेल्याचा घास हा दैनंदिन उपक्रम मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून सुरु केला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांच्या हस्ते झाला.
या उपक्रमाच्या माध्यमांतून कात्रजसह दक्षिण पुणे परिसरातील १०० गरजू लोकांना दररोज मोफत जेवण देण्यात येणार आहे. जागतिक भूकमारीचा निर्देशांक वाढत जात असल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे भुकेल्या लोकांना अन्न देण्याची प्रामुख्याने गरज असल्याचे निदर्शनास आले, यामुळे भुकेल्यांपर्यंत अन्न पोहचविण्याची खरी गरज आहे.
गरजूंची दोन वेळच्या अन्नाची गरज भागली तर त्यांच्याकडे शास्वती येईल आणि ते नोकरीच्या शोधात निघतील. त्यामुळे त्यांच्यासमोर नवा पर्याय समोर येईल आणि याच कृतीतून महाराजांना खरे अभिवादन ठरेल असा विचार मांडत प्रतिष्ठानने हे काम सुरु केले असल्याचे यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरिराज सावंत यांनी सांगितले. यावेळी अॅड. दिलीप जगताप, दादा देवकर, अरुण हांडे, शंकर कडू, दत्तराज कड यांच्यासह नागरिक उपस्थित उपस्थित होते.
मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे वाहून नेली जाणार असून गरजवंत व्यक्ती असतील तेथे ही व्हॅन पोहचेल. आमचे स्वयंसेवक अन्नाची पाकिटे थेट गरजू व्यक्तीच्या हाती सोपवतील. या माध्यमातून मुख्यतः कोणीही उपाशी राहणार नाही, याची आम्ही खबरदारी घेणार आहोत. - गिरिराज सावंत, अध्यक्ष, कार्यसिद्धी प्रतिष्ठान