
Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यावर शौचालयासाठी वणवण
कात्रज : कात्रज कोंढवा रस्त्याचा प्रश्न मागील चार वर्षांपासून रेंगाळलेला असताना या परिसरात शौचालयासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. कात्रजचौक ते खडीमशीन चौक परिसरात एकही शौचालय नाही. या भागात महापालिकेला साधे एकही सार्वजनिक शौचालय उभारता आलेले नाही ही बाब आश्चर्यजनक आहे. शौचालयाअभावी महिला नागरिकांची तर मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिका या परिसरात शौचालय कधी बांधणार असा प्रश्न नागरीक उपस्थित करत आहेत.
कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात अनेकठिकाणी भाजीपाला विक्री करणारे लोकांसह छोट्या मोठ्या व्यवसायिकांचा वावर असतो. परिसरात मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत वर्ग आहे. भागातील नागरिकांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याचा विचार करता महापालिकेने मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
हा मुख्य रस्ता असून अशा मुख्य रस्त्यावर एकही सार्वजनिक शौचालय नाही. परिसरातील व्यावसायिकांना यासाठी एकमेकांच्या दुकानातील शौचालयाचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे महापालिकेकडून या भागात शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी अशी नागरीक मागणी करत आहेत.
घरातून बाहेर पडल्यानंतर जर लघुशंकेचा प्रश्न आला तर पुरुष मंडळी कुठेतरी आडोशाला सोय करू शकतात परंतु महिलांचे काय? त्यात काही ठिकाणी पुरुष रस्त्यांवरच लघुशंका करताना दिसतात. त्याचबरोबर, उघड्यावर लघुशंका केल्याने दुर्गंधी आणि रोगराईला निमंत्रण मिळत असल्याने नागिरकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात महिलांसाठी शौचालयाची खूप गरज आहे. महापालिकेने शौचालय करायला हवे मात्र, ते करताना त्याच्या आजूबाजूला परत कचराकुंडी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी
- डॉ. सुचेता भालेराव, महिला नागरिक
कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात कात्रज चौक वगळता एकही शौचालय नसणे ही अतिशय निंदनीय बाब आहे. याचा ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा रस्ता रहदारीचा असून मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा असते. त्यामुळे परिसरात शौचालायला जर जागा मिळत नाही की, महापालिकेची इच्छा नाही हेच कळत नाही.
- संतोष धुमाळ, स्थानिक नागरिक
कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. मात्र, भविष्यातील लोकांची गरज लक्षात घेऊन या भागात योग्य ठिकाणी शौचालयासाठी जागेची पाहणी करून जागा मिळाली तर आम्ही शौचालय बांधून देऊ.
संदीप कदम, उपायुक्त, परिमंडळ ४