pune: फास्टॅग असूनही खेड-शिवापूर टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फास्टॅग असूनही खेड-शिवापूर टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी कायम

फास्टॅग असूनही खेड-शिवापूर टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी कायम

खेड-शिवापूर : टोलनाक्यावर फास्टॅगद्वारे टोलवसुली बंधनकारक असली तरीही खेड-शिवापूर टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी मात्र काही हटलेली नाही. खेड-शिवापूर टोल प्रशासनाच्या गचाळ आणि ढिसाळ व्यवस्थापनामुळे फास्टॅग असूनही प्रवाशांचा टोल नाक्यावर वेळ वाया जात आहे. रविवारी दिवसभर खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

नियोजनशून्य व्यवस्थापनामुळे खेड-शिवापूर टोल नाक्यावर कायमच वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. त्यातच टोल नाक्यांवर फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे तरी येथील टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी कमी होईल, अशी आशा होती. मात्र फास्टॅग असूनही सुट्टीच्या दिवशी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी ठरलेली असते. खेड-शिवापूर टोल नाक्याच्या नियोजनशून्य व्यवस्थापनामुळे प्रवाशांना फास्टॅग असूनही टोल नाक्यावर वाहनांच्या रांगेत उभे राहावे लागते.

रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत येथील साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी असलेल्या टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर दुपार नंतर पुण्याच्या बाजूकडील टोल नाक्यावरील वाहनांची रांग सुमारे एक किलोमीटर पाठीमागे गेली होती. यामुळे येथील खोपी फाट्यावरील उड्डाणपूलावर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच या वाहतूक कोंडीमुळे काही दुचाकीस्वार घसरून अपघातही झाले. एकंदरीतच टोलनाका प्रशासनाच्या गचाळ नियोजन आणि निष्काळजीपणामुळे प्रवाशांना खेड-शिवापूर टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

याबाबत पुणे-सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटीया म्हणाले, "वाहनांची गर्दी वाढली की टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागतात. त्यातच वाहनांच्या रांगेतून जाणाऱ्या स्थानिक वाहनांची नोंद करताना वेळ वाया जातो. त्यामुळे गर्दीच्या वेळी वाहनांच्या रांगा लागतात."

इन्फोबॉक्स

अनेक कर्मचाऱ्यांना गणवेश नाही

खेड-शिवापूर टोल नाक्यावर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना गणवेश नाही. त्यामुळे टोल घेणारी व्यक्ती खरंच अधिकृत आहे का? असा प्रश्न प्रवाशांना पडतो. याबाबत भाटीया म्हणाले, "सत्तर टक्के कर्मचाऱ्यांना गणवेश आहे. तर उर्वरित कर्मचाऱ्यांना लवकरच गणवेश दिला जाईल."

loading image
go to top