

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ९ : सुधारित आकृतिबंधानुसार मंजूर पदांवर पदोन्नती देण्यासह सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी भूमी अभिलेख विभागातील वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांनी उद्यापासून (ता. १०) दोन दिवसांचे सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमधील सुमारे एक हजार ८०० भूकरमापक, शिरस्तेदार आणि परिरक्षण भूमापक या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
दोन दिवसांच्या सामूहिक रजा आंदोलनानंतरही मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास पाच ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्ग मृत घोषित करून त्याचा परिरक्षण भूमापक संवर्गात समावेश करण्यात आला आहे. भूकरमापकांना ‘एस-८’, तर परिरक्षण भूमापकांना ‘एस-१२’ वेतनश्रेणी लागू करण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. मात्र, सुधारित वेतनश्रेणी कोणत्या तारखेपासून लागू करायची, याबाबत स्पष्टता नसल्याने कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळालेला नाही. सातवा वेतन आयोग लागू झाल्याच्या एक जानेवारी २०१६ पासून वेतनातील फरकासह सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या संदर्भात संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश थोरात म्हणाले, ‘‘सुधारित आकृतिबंध आणि वेतनश्रेणीचे शासन निर्णय होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दरमहा जुन्या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळत असून मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पदोन्नती, प्रवासभत्ता आणि आवश्यक मोजणी साहित्याचे प्रश्नही प्रलंबित आहेत. राज्य सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा.’’
याबाबत जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल म्हणाले, ‘‘कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न शासनस्तरावरील आहे. याबाबत मंत्रालयस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. राज्य शासन यासंदर्भात योग्य तो निर्णय घेईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.