Ajit Pawar: पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य म्हणाले, 'घाईगर्दीत कोणाला पायात...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar criticize shinde fadanvis govt supreme court nashik

Ajit Pawar: पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य म्हणाले, 'घाईगर्दीत कोणाला पायात...'

भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं तीन दिवसांपूर्वी निधन झालं आहे. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, बापट यांना जाऊन तीन दिवस उलटले नाही तोपर्यंत पुण्यात भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून बॅनर शहरात लावण्यात आले आहेत. तोच काँग्रेसनेही या जागेवर दावा केला आहे.

गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काल (शुक्रवारी) ही माहिती दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही यासंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे.

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार यांना पुण्यातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले की, घाईगर्दीत कोणाला पायात घुंगरु बांधण्याची गरज नाही. गिरीश बापट यांचे निधन होऊन फक्त तीन दिवस झाले आहेत. मानवता नावाची काही गोष्ट आहे की नाही? राज्याच्या राजकारणाची काही परंपरा आहेत. नीतीमूल्य आहेत. या पद्धतीने वक्तव्य करताना महाविकास आघाडीला लाज का वाटत नाही? इतकी असंवेदनशीलता कशाला? असं म्हणत अजित पवार यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना फटकारले आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हंटले होते की, आम्ही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेची पोटनिवडणूक पुण्यात बिनविरोध होणार नाही. यापूर्वी पोटनिवडणुकांवेळी भाजपने कुठे आम्हाला बिनविरोध निवडून येऊ दिलं आहे.

प्रत्येकवेळी भाजप लढली आहे. त्यामुळे आम्हीही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. ज्या ज्या निवडणुका येतील, त्या त्या महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवार चांगलेच संतापले.

अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्याला चांगलेच सुनावले असताना गिरीश बापट यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी अतिघाई केली आहे. भाजप कार्यकर्ते आणि पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचा आज वाढदिवस आहे. ते माजी आमदार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुळीक यांच्या नावाचे मोठमोठे बॅनर्स लावले आहेत. त्यावर भावी खासदार जगदीश मुळीक असं लिहिलं आहे. भावी खासदार जगदीश मुळीक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं या बॅनर्सवर लिहिलं आहे. चौफेर टीका होऊ लागल्यानंतर हे बॅनर काढले गेले आहे.