Pune : पुण्याची हद्द वाढली पाच पटींनीमतदारसंघ दोनाचे चार; ११ पट वाढले मतदार

पुणे जिल्ह्यातील चित्र; ७३ वर्षांत सात लाखांवरून संख्या पोहोचली ८१ लाखांवर
pune lok sabha election 11 time growth in voters politics
pune lok sabha election 11 time growth in voters politicsSakal

पुणे : लोकसभेच्या गेल्या १७ निवडणुकांत पुणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या तब्बल ११ पटींनी वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या ७३ वर्षांत दोन लोकसभा मतदारसंघही वाढले आहेत. लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत म्हणजे १९५१ मध्ये पुणे जिल्ह्यात पुणे मध्य आणि पुणे दक्षिण हे दोन लोकसभा मतदारसंघ होते.

संपूर्ण जिल्हा या दोन मतदारसंघांत विभागला होता. त्यात अनुक्रमे ३ लाख ८८ हजार आणि ३ लाख ७८ हजार म्हणजेच एकूण ७ लाख ६७ हजार २९६ मतदारसंख्या होती. त्यानंतर १९५७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे मध्य आणि दक्षिण या मतदारसंघांची विभागणी होऊन पुणे शहर,

बारामती आणि खेड हे तीन मतदारसंघ अस्तित्त्वात आले. दरम्यानच्या काळात पुणे जिल्ह्याचा वेगाने विकास झाला. त्यामुळे २००९ मध्ये खेड लोकसभा मतदारसंघाची विभागणी झाली आणि मावळ आणि शिरूर हे लोकसभा मतदारसंघ निर्माण झाले.

यंदाच्या म्हणजेच २०२४ च्या निवडणुकीत पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभा मतदारसंघांची एकत्रित मतदारसंख्या आता ८१ लाख २७ हजार ०१९ झाली आहे. मावळ मतदारसंघात येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील कर्जत,

उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघांतील मतदार लक्षात घेतले, तर एकूण मतदारसंख्या ९३ लाख ०८ हजार ४८७ होते. त्यातून गेल्या १७ लोकसभा निवडणुकांत जिल्ह्यातील मतदारांची संख्या ११ पटींहून अधिक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पानशेत धरण फुटल्यानंतर विस्तार

पुण्यात महापालिकेची स्थापना १५ फेब्रुवारी १९५० मध्ये झाली. तेव्हापासून पेठांपुरते मर्यादित असलेले शहर चारही दिशांनी विस्तारू लागले. शहरापासून ७-८ किलोमीटर अंतरावर अनेक ग्रामपंचायती होत्या. त्यांचा शहराशी संपर्क असला तरी त्यांचे अस्तित्त्व स्वतंत्र होते.

१९६२ मध्ये पानशेत धरण फुटले. पुण्याच्या मध्यभागाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे दत्तवाडी, महर्षीनगर, राजेंद्रनगर आदी भागांत पूरग्रस्त वसाहती अस्तित्त्वात झाल्या. शहर पेठांच्या पलीकडे विस्तारले. १९७२ मध्ये राज्यात मोठा दुष्काळ पडला.

त्यामुळे बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, नगरमधून मोठ्या संख्येने नागरिक पुण्यात स्थलांतरित झाले. त्यामुळे हडपसर, पर्वती, मुंढवा, केशवनगर, सहकारनगर भागात नव्या वसाहती निर्माण झाल्या. त्यातील काही नागरिक अजूनही तळजाई पायथा, जनता वसाहत, दांडेकर पूल, पाटील इस्टेटमध्ये राहतात. त्यामुळेही पुण्याचा विस्तार होत गेला.

साखर कारखाने, कृषिपूरक उद्योग

दरम्यानच्या काळात खडकी, पिंपरी, चिंचवड, भोसरीचा विस्तार होत गेला. तसाच जिल्ह्याचाही विकास होऊ लागला. बारामती, वालचंदनगर, दौंड, खेड- शिवापूर, सिंहगड रस्त्यावर झालेल्या भरभराटीमुळे बारामती लोकसभा मतदारसंघ बहरला. त्यातच साखर कारखाने, कृषीपूरक उद्योग वाढले. तसेच शैक्षणिक संस्थांचेही जाळे निर्माण झाले. त्यामुळे उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊ लागले. परिणामी अन्य जिल्ह्यांतून पुण्यात स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढू लागली.

शैक्षणिक सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा ओघ

या सुमारास शहर आणि परिसरात शैक्षणिक संस्थांची संख्या वेगाने वाढली. त्यामुळे इतर जिल्ह्यांतील, राज्यांतील विद्यार्थी पुण्यात येऊ लागले. परिणामी शहरापेक्षा भोवतालची उपनगरे आणि जिल्ह्याच्या सीमेवरील गावे विकसित होऊ लागली. त्यामुळे पुणे जिल्ह्यात स्थलांतराचा वेग वाढला. जिल्ह्याची मतदारसंख्या ८१ लाखांवर पोहोचली.

असा झाला विस्तार

१९५४ : हिंदुस्थान अॅंटिबायोटिक्स कंपनी पिंपरी-चिंचवडमध्ये आली.

१९६० : या दशकात भोसरी औद्योगिक वसाहत निर्माण झाली.

१९८२ : पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना झाली. त्यानंतर तर पिंपरी-चिंचवडची वाढ वेगाने झाली.

१९९६ : २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश

२००० : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आयटी कंपन्यांची संख्या हिंजवडी, वाकड, औंध, बाणेर, विमाननगर, कल्याणीनगर, हपडसरमध्ये वाढली.

२०१७ : ११ आणि २०२१ मध्ये २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाली.

२००९ : मावळ आणि शिरूर हे स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ झाले. नगर रस्ता, वाघोली, शिक्रापूर, चाकण, मंचर, आंबेगाव परिसरात झालेली भराभराट शिरूर लोकसभेसाठी पूरक ठरली.

७२ हजारांनी मतदार घटले

पुणे लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये २० लाख ७५ हजार ८२४ मतदार होते, तर यंदाच्या निवडणुकीत २० लाख ३ हजार ३१६ मतदार झाले आहेत. पहिल्यांदाच पुण्यातील संख्या सुमारे ७२ हजारांनी कमी झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा केली असता, मृत्यू झालेले, दुबार नोंदणी, स्थलांतरित आदी प्रकारची नावे कमी करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे सुमारे दीड लाख नावे कमी झाली, तसेच नव्यानेही नोंदणी झाली आहेत.

पुण्याची हद्द वाढली पाच पटींनी

पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील मतदारसंख्या गेल्या १७ निवडणुकांमध्ये ४ लाखांवरून २० लाखांपर्यंत पोहोचली आहे. शहराची हद्दही ११० वरून ५०४ चौरस किलोमीटर झाली आहे. नवे बदल स्वीकारत विस्तारत असलेल्या पुण्याची वाटचाल आता मेट्रो शहराच्या दिशेने सुरू झाली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार

  • २००९ : मतदारसंघ अस्तित्त्वात आला

  • विधानसभा मतदारसंघ : मावळ, चिंचवड, पिंपरी, उरण, कर्जत, पनवेल

  • चिंचवड विधानसभा सर्वाधिक मोठा मतदारसंघ : ५ लाख ९५ हजार ४०८

  • पूर्वी हा मतदारसंघ खेड लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होता

शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदार

  • २००९ : मतदारसंघ अस्तित्त्वात आला

  • विधानसभा मतदारसंघ : जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरूर, भोसरी, हडपसर

  • हडपसर विधानसभा, सर्वाधिक मोठा मतदारसंघ : ५ लाख ७७ हजार ६३०

  • पूर्वी हा मतदारसंघ खेड लोकसभा मतदारसंघात होता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com