Ajit Pawar : दादांच्या कार्यकर्त्यांची वाट खडतर

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा जोरदार पराभव केला. त्याचा मोठा फायदा शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणार आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal

प्रकाश शेलार

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा जोरदार पराभव केला. त्याचा मोठा फायदा शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांसाठी आगमी निवडणुका खडतर ठरणार आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील फुटीनंतर पुणे जिल्ह्याच्या राजकारणावर कोणाचे वर्चस्व राहणार, हे अधोरेखीत करणारी ही पहिलीच निवडणूक होती. त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर आजही आपलीच छाप असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक कागदोपत्री प्राबल्य असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी धोक्याची घंटा आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात बहुतांश पदाधिकारी हे अजित पवार यांच्या बाजूने असतानादेखील मतदारांनी सुप्रिया सुळे यांना कौल दिला. त्यामुळे आगामी काळात निवडणुकांसाठी यापैकी काही पदाधिकारी पक्षांतर करण्याची शक्यता आहे. तसेच वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात लढणारे विधानसभेचे उमेदवार एकमेकांसोबत आल्याचे जनतेला रुचले नसल्याचे दौंड, इंदापूर व खडकवासला मतदारसंघांच्या आकडेवारीवरून दिसत आहे. दौंडमध्ये आमदार राहुल कुल व जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात यांनी प्रचार करूनसुद्धा हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या गावांमध्ये घड्याळाला मताधिक्य मिळाले आहे.

इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रेय भरणे, हर्षवर्धन पाटील व प्रवीण माने एकत्र येऊनसुद्धा एखादी दुसरी फेरी वगळता सर्व फेऱ्यांमध्ये सुळे यांना मताधिक्य मिळाले आहे. याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसणार आहेत. पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मर्यादित आहे. राष्ट्रवादीचे दिगंबर दुर्गाडे, विराज काकडे, दत्ता झुरंगे यांनी प्रामाणिकपणे काम केले. मात्र भविष्यात येथील विधानसभेची जागा महायुतीत शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतरे यांना मिळण्याची शक्यता असल्याने येथील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विशेष फरक पडणार नाही.

भोर तालुक्यात राष्ट्रवादीचे भालचंद्र जगताप, रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, संतोष घोरपडे आदी पदाधिकाऱ्यांची फळी असूनही राष्ट्रवादीला कमी मताधिक्य झाले आहे. मुळशीत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, शांताराम इंगवले, अमित कंधारे, रवींद्र कंधारे, कालिदास गोपालघरे या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काम केले. हीच परिस्थिती राजगड तालुक्यात आहे. ३ तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीला तुलनेने कमी मताधिक्य झाल्याने आगामी काळात दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. खडकवासला मतदारसंघांत आमदार भीमराव तापकीर व‌ रूपाली चाकणकर यांच्या एकत्र येण्याचा पाहिजे असा फायदा झालेला नाही. याचा परिणाम आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे. एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी आत्मपरीक्षण करणारी ठरणार आहे, एवढे मात्र नक्की!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com