

Lonikand police seize MD drugs, pistols and cars during raids across Pune.
esakal
पुणे : सलग सात दिवस लोणीकंद पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून १२८ ग्रॅम 'मेफेड्रॉन' (एमडी) ड्रग्ज, तीन देशी बनावटीची पिस्तुले, पाच जिवंत काडतुसे आणि तीन आलिशान कारसह सात सराईत गुन्हेगारांना अटक केली. पोलिसांनी या कारवाईत २३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी लोणीकंद पोलिसांचे पथक गस्तीवर असताना पोलिस कर्मचारी शुभम चिनके व सुधीर शिवले यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे कटकेवाडी फाटा येथून प्रतीक उर्फ सोन्या दत्तात्रय होले (वय ३५, रा. लोणीकंद) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १९ ग्रॅम एमडी ड्रग्ज, देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि एक कार असा ९ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.