Pune : ग्रामसभेला गणपूर्ती होण्यासाठी ग्रामपंचायतचा उपस्थितांसाठी लकी ड्रॉ: ग्रामसभेला गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : ग्रामसभेला गणपूर्ती होण्यासाठी ग्रामपंचायतचा उपस्थितांसाठी लकी ड्रॉ: ग्रामसभेला गर्दी

मंचर : ग्रामपंचायतीना ग्रामसभा यशस्वी होण्यासाठी व गणसंख्या पूर्तीसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्यांना कसरत करावी लागते. अनेकदा पुरेशा गणसंख्ये अभावी ग्रामसभा तहकूब झाल्याची घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीने नामी शक्कल लढविली आहे. गणसंख्या पूर्ती होण्यासाठी उपस्थितांमधून लकी ड्रॉ पद्धतीने कुपन काढून भाग्यशाली विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्याचे जाहीर केले. त्यामुळे गुरुवारी झालेल्या ग्रामसभेला गणसंख्या पूर्ती होऊन उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला.

सरपंच वैभव पोखरकर यांच्या अध्यक्षतेखाली व उपसरपंच योगेश पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभा पार पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश खिरड, भाऊ डोके, सुप्रिया पिंगळे, आशा वाळूंज, सुजाता वायकर, कल्पना कडधेकर, रेश्मा दैने, सुजाता भुते, ग्रामसेवक सचिन नवले व गावकरी उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात. भेटवस्तू साठी बाळशिराम सहादु दैने, विष्णू बबन पिंगळे, शीतल तेजस वायकर या भाग्यशाली विजेत्याना बक्षिसे देण्यात आली. ग्रामपंचायतच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. बाळासाहेब पिंगळे, संतोष पिंगळे, सुरेश डोके, सुरेखा कडूसकर आदींनी सभेत भाग घेतला.

“श्री स्वयंभू मोरया देवस्थान ट्रस्टला गायरान जमिनीतील चार एकर जागा देणे. ज्येष्ठ नागरिक संघासाठी सभागृह बांधकाम करून देणे, ग्रामपंचायत सन २०२३ – २४ वार्षिक आराखड्याला मंजुरी.आदी ठराव मंजूर झाले आहेत. गावातील विकास कामे गतीने केली जातील.”

वैभव पोखरकर, सरपंच वडगाव काशिंबेग

श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) : गणसंख्या पूर्ती होण्यासाठी उपस्थितांमधून लकी ड्रॉ पद्धतीने कुपन काढून भाग्यशाली विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देताना सरपंच वैभव पोखरकर.