Mango Fruit : पुण्यात फळांच्या राजाचे राज्य

आंबा आणि नारळ हे फक्त कोकणातच येत नाहीत, तर आमच्या पुण्यातही बहरतात. शहरात असणाऱ्या फळझाडांमध्ये सर्वाधिक आंब्यांची झाडे असून, त्यांची संख्या ७७ हजार इतकी आहे.
Mango Fruit
Mango FruitSakal
Summary

आंबा आणि नारळ हे फक्त कोकणातच येत नाहीत, तर आमच्या पुण्यातही बहरतात. शहरात असणाऱ्या फळझाडांमध्ये सर्वाधिक आंब्यांची झाडे असून, त्यांची संख्या ७७ हजार इतकी आहे.

पुणे - आंबा आणि नारळ हे फक्त कोकणातच येत नाहीत, तर आमच्या पुण्यातही बहरतात. शहरात असणाऱ्या फळझाडांमध्ये सर्वाधिक आंब्यांची झाडे असून, त्यांची संख्या ७७ हजार इतकी आहे. त्याखोलाखोल नारळ आणि पेरूची झाडे असल्याची माहिती महापालिकेच्या वृक्षगणनेतून पुढे आली आहे.

‘जिओग्राफिक्स इन्फॉर्मेशन सिस्टीम’च्या (जीआयएस) माध्यमातून वृक्षगणना करणारी पुणे ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. मोजणी केलेल्या प्रत्येक झाडाची माहिती, त्याचे भौगोलिक स्थान, त्या झाडाची प्रजाती, त्याचे स्थानिक आणि शास्त्रीय नाव, त्याचे अक्षांश आणि रेखांश या सगळ्याची माहिती जिओ टॅगिंग पद्धतीने संकलित केली जाते. त्या आधारावर शहरात ५१ लाख ३७ हजार ६३२ झाडे असल्याचे गणनेतून स्पष्ट झाले.

आठ टक्के फळझाडे

शहरात असलेल्या एकूण झाडांपैकी सुमारे आठ टक्के फळझाडे आहेत. त्यांची संख्या चार लाख २३ हजार ८६७ असून, त्यात सर्वाधिक आंब्याची ७६,७५१ झाडे आहेत. त्याखालोखाल नारळ ७०,५४२, पेरू ३६,४९३, सीताफळ ३१,२१५, देशी बदाम २८,४६४, जांभूळ २७२२०, बोर १९,३२२, लिंबू १५,०१९, चिंच १४,७९० आणि चिकू १२,०६६ अशा वेगवेगळ्या ७६ प्रकाराच्या फळझाडांचीही नोंद पुण्यात झाली आहे.

आंब्याच्या झाडांची संख्या जास्त का?

पुण्याचे भौगोलिक स्थान पश्चिम महाराष्ट्रात आहे. येथील जमीन ही सुपीक आहे. आंबा, पेरू, डाळिंब या फळांसाठी पोषक वातावरण येथे असल्याने आंब्याची झाडे सर्वाधिक असल्याचे दिसते.

गिरिपुष्प झाडे का वाढली?

शहरात तीन दशकांपूर्वी राबविण्यात आलेल्या वृक्षारोपणातून गिरिपुष्प ही झाडे लावण्यात आली. ही परदेशी वनस्पती आहे. महापालिकेच्या हद्दीतील टेकड्यांवर प्राधान्याने ही झाडे लावली. त्यामुळे त्या काळात होणारी मातीची धूप थांबली. पण, आता त्यापुढे जाऊन स्थानिक वृक्ष लागवड करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे शहरात वड, पिंपळ, चिंच, जांभूळ अशी देशी झाडे भविष्यात लावण्यात येत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाचे मुख्य अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिली.

४३० - वृक्षांच्या प्रजाती

वड (१२०२ सेंटिमीटर) - सर्वांत मोठे खोड असलेले झाड

गिरिपुष्प - सर्वाधिक संख्या असलेली झाड

१२४ - दुर्मीळ वृक्षांची संख्या

उपयुक्ततेनुसार झाडांचे वर्गीकरण

१९,४४,२६६ - लाकूडफाटा

७,९५,३४५ - शोभेची झाडं

४,२३,८६७ - फळझाडे

११,६७,५०३ - इंधन

७८,२२५ - तेलबिया

६,२८,३४५ - औषधी वनस्पती

वृक्षगणनेसाठी पाच वर्षांची निविदा काढण्यात आली आहे. त्याअंतर्गत शहरातील प्रत्येक झाडाची नोंद केली जाते. त्यांची छायाचित्रे घेतली जातात. त्या झाडाची सद्यःस्थिती कशी आहे, त्याला कीड लागली आहे का, याची सविस्तर माहिती यातून मिळते.

- अशोक घोरपडे, मुख्य अधीक्षक, उद्यान विभाग, पुणे महापालिका

झाडाच्या प्रत्येक नोंदी घेतल्या जातात. त्यामुळे झाडांची सुरक्षितता वाढते. तसेच, भविष्यात कोणत्या भागात कोणती झाडे लावण्याला प्राधान्य दिले पाहिजे, याची माहिती जिओ टॅगमधून मिळते आणि कोणत्या भागात अजून वृक्षारोपण करता येईल, याची सूचीही यातून तयार होते.

- योगेश कुटे, जिओ स्पेशल प्रमुख, एसएएआर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com