बाजार समितीचा गाळ्यासमोरील जागेसाठी १० हजार रुपये भाडे आकारणीचा प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune market yard

कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळ्यासमोरील १० फुटाच्या जागेसाठी ‘जागा वापर आकार’ म्हणून महिन्याला १० हजार रुपये भाडे आकारणीचा प्रस्ताव ग्रामीण उपनिबंधक कार्यालयाला दिला आहे.

Pune Market Yard : बाजार समितीचा गाळ्यासमोरील जागेसाठी १० हजार रुपये भाडे आकारणीचा प्रस्ताव

मार्केट यार्ड - कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळ्यासमोरील १० फुटाच्या जागेसाठी ‘जागा वापर आकार’ म्हणून महिन्याला १० हजार रुपये भाडे आकारणीचा प्रस्ताव ग्रामीण उपनिबंधक कार्यालयाला दिला आहे. या प्रस्तावाला मार्केट यार्डातील अडते असोसिएशने विरोध करत बाजार बंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासन आणि अडते संघटनांमधील वाद वाढण्याची शक्यता आहे.

बहुतांश अडते आपल्या गाळ्यावर आणि गाळ्यासमोरील १५ फुटाचे जागेवर त्यांचे व्यापारी प्रतिनिधी म्हणून अनधिकृत इसम व विक्रेते (डमी) ठेवत असून, त्यांच्याकडून जागा वापराबाबत मासिक भाडे रक्कम घेत आहेत. अनधिकृत इसम यांचा व्यवहार पारदर्शक नसल्याने, बाजार समितीचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत त्यांच्याकडून मासिक दहा हजार रुपये आणि त्यावर जी.एस.टी. जागा वापर आकार आणि सेवासुविधा शुल्क आकारणी करणे. तसेच आकारणीमध्ये प्रत्येक वर्षी एक हजार रुपयांची वाढ करण्याच्या प्रस्ताव बाजार समितीने उपनिबंधक कार्यालयाला दिला होता. या प्रस्तावाला अडते असोसिएशन आणि बाजारातील बहुतांशी अडत्यांनी विरोध केला आहे.

या प्रस्तावाबाबत बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात अडते असोसिएशन आणि बाजार समिती प्रशासन यांच्यात बैठक झाली. यामध्ये देखील चर्चेअंती कोणताही निर्णय होऊ शकला नाही. अडते असोसिएशनच्या वतीने दिलेल्या प्रस्तावाला विरोध असल्याचे पत्र बाजार समितीला दिल्याचे अडते असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.

याबाबत भेटून सविस्तर चर्चा केली आहे. सर्व अडते शेतमालाचा व्यवसाय करत आहेत. त्यासाठी बाजार समितीने उपलब्ध करून दिलेल्या जागेवरच सर्व आडते व्यवसाय करत आहेत. शेतमाला व्यतरिक्त कोणताही अतिरिक्त व्यवसाय करत नाही. प्रस्तावास सर्व अडतदारांचा एकमताने तीव्र विरोध आहे. प्रस्ताव आडतदारांवर लादला गेला तर असोसिएशनच्या वतीने बाजार आवार बेमुदत बंद ठेवण्यात येईल.

- अनिरुद्ध (बापू) भोसले, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन, पुणे

वर्षाकाठी सेस स्वरूपात कोट्यवधीची रक्कम भरतो. मागिल दहा वर्षात बाजार समितीत १८५ कोटी रुपये सेस स्वरूपात भरले आहेत. असे असताना सुद्धा बाजार समिती आमच्याकडुन अतिरिक्त जागेचा वापर आकार वसूल करण्याच्या तयारीत आहे. या सर्व गोष्टींना बाजार सर्व अडत्यांचा विरोध आहे. याबाबत वसुली सुरू झाल्यास बाजार बेमुदत बंद ठेवण्यात येईल.

- विलास भुजबळ, माजी अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन, पुणे