
पुणे : मस्तानी तलाव पाण्याअभावी कोरडा ठाक
उंड्री : शहराचे नव्हे राज्याच्या वैभवात भर घालणारा दिवेघाटाच्या पायथ्याशी वसलेला ऐतिहासिक मस्तानी तलाव कोरडा ठाक पडला आहे. तलावामध्ये पाणी नसल्याने पर्यटकांची निराशा होत आहे. राज्य शासन आणि पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षामुळे तलावाची पडझड झाली आहे, त्यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील वडकीनाला (ता. हवेली) येथील नागमोडी वळणाच्या दिवेघाटात पेशवेकालीन मस्तानी तलावाच्या कडेला पाण्याचे डबके आहे. पाऊस कमी झाला असून, डोंगरावरून येणारे पावसाचे पाणीही तलावात आणण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही यंत्रणा राबविली नाही. त्यामुळे तलावामध्ये दरवर्षी पाणीसाठा कमी कमी होऊ लागला आहे. मस्तानी तलावाचे वैभव कायम टिकविण्यासाठी प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकून विकास करण्याची गरज आहे, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
मस्तानी तलावाकडे पुरातत्त्व खाते व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे देखभाल दुरुस्ती होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. मस्तानी तलावाची चिरेबंदी संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळत असल्याचे दिसून येत आहे. झाडेझुडुपे, गवत वाढले असून, तटबंदीही ढासळत आहेत. डोंगरावरून पावसाच्या पाण्याबरोबर दगड-गोटे, माती थेट तलावात पडत असल्याने तलावाचे पात्र उथळ होऊ लागले आहे.
ऐतिहासिक मस्तानी तलावाचा पर्यटनस्थळ म्हणून विकासासाठीच्या घोषणा वारंवार केल्या जातात. मात्र, त्या निवडणुका झाल्या की हवेत विरून जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. पर्यटनस्थळ म्हणून मस्तानी तलावाचा विकास केला, तर नोकरदार-कामगार वर्गाला एक दिवशीय सहल, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा पाहण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर येथे पूरक व्यवसाय सुरू होऊन, रोजगार उपलब्ध होईल. तसेच ऐतिहासिक वारसा कायमचा जतन होऊन कायमस्वरूपी महसूल उपलब्ध होऊ शकतो, असा विश्वास स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला.
मस्तानी तलाव १४ एकर क्षेत्रामध्ये असून, त्यामध्ये ५० फूटांहून अधिक पाणी साठा राहतो. मात्र, मागिल वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे यंदा मस्तानी तलाव कोरडा पडला. या तलावामुळे विहिरी आणि बोअरवेलला पाणी मिळत असल्याने या परिसरातील क्षेत्र बागायती झाले आहे. आमदार संजय जगताप आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मस्तानी तलाव परिसर पर्यटनस्थळ व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी १५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
- अरुण गायकवाड, सरपंच- वडकी
Web Title: Pune Mastani Lake Dry Tourist Dissatisfaction Neglect Archeology Department
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..