

पुणे, ता. २१ : गणेशखिंड रस्त्यावरील मेट्रो मार्गिकेखाली सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा आणि अपूर्ण कामांवरून पुणे महापालिका प्रशासनाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कामावर महापालिकेतील बैठकीत नाराजी व्यक्त केली. जानेवारीमध्ये होणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर’ या सायकल स्पर्धेच्या पूर्वी दुभाजकांच्या कामासह रस्ते समपातळीत आणणे, सुशोभीकरण आदी कामे करण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. तसेच, कामाचा दर्जा चांगला ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मेट्रो मार्गिका क्रमांक तीनअंतर्गत जिल्हा न्यायालय ते बालेवाडी या मार्गावरील रस्त्यांच्या कामांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. या वेळी गणेशखिंड आणि बाणेर रस्त्यावरील कामांचा दर्जा, दुभाजकांची स्थिती, वाहतूक व्यवस्था आणि रस्ते सुरक्षिततेबाबत चर्चा झाली. कामांमधील त्रुटींवरून प्रशासनाने नाराजी व्यक्त करत संबंधित यंत्रणांना कामे सुधारण्याचे निर्देश दिले. ‘पुणे ग्रँड टूर २०२७’च्या सुमारे साडेचार किलोमीटरच्या मार्गावरील दुभाजकांची दुरुस्ती आणि उर्वरित कामे ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावी लागणार आहेत. उर्वरित कामे व आवश्यक सुधारणा ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.
प्रलंबित कामांवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेचा पथ विभाग, पीएमआरडीए, टाटा प्रोजेक्ट्स आणि वाहतूक पोलिसांचा संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे. हा कार्यगट कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेऊन साप्ताहिक अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करणार आहे.
गणेशखिंड रस्ता हा ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या मार्गामध्ये आहे. याच भागात मेट्रोची कामे सुरू असून, तेथे असुविधा निर्माण झाली आहे. रस्ता समपातळीत नाही, दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. ही सर्व कामे त्वरित पूर्ण करावीत. त्यांचा दर्जा चांगला असला पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
- नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका
अनावश्यक बॅरिकेड्स काढून टाका
संचेती रुग्णालय ते बालेवाडी मार्गावरील बांधकामाचा राडारोडा, अतिरिक्त साहित्य आणि पदपथांवरील अडथळे काढून टाका. कामे पूर्ण झालेल्या ठिकाणचे अनावश्यक साहित्य, बॅरिकेड्स आणि फलक एका आठवड्यात हटविण्यात यावेत. पादचारी सुविधा, सायकल मार्ग, महत्त्वाचे चौक आणि यू-टर्नच्या ठिकाणी आवश्यक सुधारणा करून रस्ता सुरक्षित व सुस्थितीत करण्यावर भर देण्याचे या बैठकीत ठरले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.