

पिंपरी, ता. ३ : ‘ए न्यू जर्नी बिगिन्स’, ‘सिटी वेटेड’, ‘द मोमेंट हॅज अराइव्हड्’ अशा वेगवेगळ्या टॅगलाईन्स... त्याला जोडलेल्या आकर्षक रिल्स आणि मेट्रोच्या प्रवासाच्या चित्रफिती... माण-हिंजवडी ते शिवाजीनगर (पुणे मेट्रो ३) मेट्रोच्या उद्घाटनानिमित्त सोशल मीडियावर असा डिजिटल जल्लोष झाला.
अनेक वर्षांपासून मेट्रोची प्रतीक्षा करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांसह तरुणाईनेही नव्या सेवेबाबत आनंद व्यक्त केला. ‘थँक्यू मोदीजी’ म्हणत अनेकांनी मेट्रोचे स्वागत केले. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील कर्मचाऱ्यांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. कार्यालयात पोहोचण्यासाठी लागणारा वेळ, रस्त्यावरील गर्दी आणि प्रवासातील अनिश्चिततेमुळे कर्मचारी त्रस्त होते. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी यापूर्वी विविध उपाययोजना करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय म्हणून मेट्रोकडे पाहिले जात होते. मार्च २०२५ पासून मेट्रोच्या उद्घाटनाच्या वेगवेगळ्या तारखा चर्चेत आल्या. त्यामुळे आयटी कर्मचारी आणि पुणेकरांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत होती. अखेर तीन नोव्हेंबरला मेट्रोचे उद्घाटन झाले आणि प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला.
त्यानंतर सोशल मीडियावर मेट्रोच्या स्वागताच्या पोस्ट, छायाचित्रे आणि चित्रफितींचा अक्षरशः पाऊस पडला. विशेषतः तरुणाई आणि ‘जेन झी’ने रिल्सच्या माध्यमातून मेट्रोच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला. मेट्रोची आकर्षक छायाचित्रे, प्रवासाचे अनुभव आणि वेगवेगळ्या टॅगलाईन्समधून नव्या प्रवासाचा उत्साह व्यक्त झाला. त्यामुळे मेट्रोचे उद्घाटन केवळ सार्वजनिक वाहतुकीचा प्रारंभ न राहता सोशल मीडियावरील चर्चेचा विषय ठरले.
डेपो ते स्थानक... प्रत्येक क्षण ‘कॅप्चर’
मेट्रोच्या माण येथील कारशेडमधील सजावट, गाडीची तयारी, स्थानकावरील हालचाली आणि बालेवाडी येथील उद्घाटन सोहळा अशा प्रत्येक टप्प्याच्या चित्रफिती सोशल मीडियावर अपलोड करण्यात आल्या. केवळ आयटी कर्मचारीच नव्हे, तर मेट्रो प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनीही हे क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपले. त्याला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कमेंट्स आणि प्रतिक्रियांमधून मेट्रोचे स्वागत केले जात आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.