नागपूरपेक्षा पुणे मेट्रो सुसाट!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

कात्रज ते निगडीपर्यंत विस्तारीकरणाचा मनोदय; शिवाजीनगरला जंक्‍शन 

कात्रज ते निगडीपर्यंत विस्तारीकरणाचा मनोदय; शिवाजीनगरला जंक्‍शन 

पुणे - पुण्याच्या मेट्रोचे औपचारिक भूमिपूजन होण्याआधीच प्राथमिक कामे सुरू झाल्याने मेट्रो लगेचच वेग घेणार आहे. या कामांसाठी नागपूर मेट्रोला लागलेला वेळ पुण्याला लागणार नसल्याने पहिल्या टप्प्यात तरी पुण्याच्या कामाचा वेग नागपूरपेक्षा अधिक असणार आहे. पिंपरी ते स्वारगेट हा मार्ग निगडीपासून सुरू करण्याची आणि स्वारगेटच्या पुढे कात्रजपर्यंत वाढविण्याची मागणीही मान्य होणार आहे. पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या दोन मार्गांप्रमाणेच पीएमआरडीएचा हिंजवडी-शिवाजीनगर मार्गही शिवाजीनगर गोदामात एकत्र येणार असल्याने तेथे जंक्‍शन होणार आहे.

नागपूर मेट्रोचे भूमिपूजन डिसेंबर २०१४ला झाले. त्यानंतर प्राथमिक कामे करण्यात बराच काळ गेला. पुण्यात मात्र अशी स्थिती असणार नाही. पुण्याचे भूमिपूजन २४ डिसेंबरला होणार आहे; मात्र नागपूर मेट्रोसाठी निविदांसाठी सल्लागार नियुक्त करणे, विविध प्रकारचे सर्वेक्षण तयार करणे, मेट्रोमार्गांची आखणी करणे, जलवाहिन्या आणि केबलवाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी आराखडा तयार करणे आदी कामे प्रत्यक्ष भूमिपूजनानंतर सुरू झाली. पुण्यात भूमिपूजनाच्या कार्यक्रमाआधीच या कामांना गती मिळाली असून, भूमिपूजन झाल्यानंतर अल्पावधीत ती पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नागपूर मेट्रोच्या या प्राथमिक कामांची पूर्तता होण्यास लागलेला वेळ पुण्यात लागणार नाही. त्यातच पहिल्या टप्प्यातील मार्ग जमिनीवरून (एलेव्हेटेड) जाणारा असल्याने आणि खासगी भूसंपादनाचे प्रमाण कमी असल्यानेही पुण्याच्या मेट्रोचा पहिला गियर कमी वेळात पडेल. 

याबाबतची माहिती नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. मेट्रो प्रकल्पासाठी काही कामांना चार-पाच दिवसांत प्रारंभ होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

दीक्षित, नागपूर मेट्रोचे संचालक महेशकुमार, रामनाथ सुब्रमण्यम यांनी नियोजित मेट्रो मार्गाची शुक्रवारी पाहणी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापालिका आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त नगर अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला या प्रसंगी उपस्थित होते. मेट्रो मार्गाची पाहणी, भूसंपादन, वित्त पुरवठा, प्रत्यक्ष कामाला होणारा प्रारंभ आदींबाबत दीक्षित यांनी माहिती देऊन संवाद साधला. राज्य सरकारच्या आदेशानुसार नागपूर मेट्रो कंपनीचे रूपांतर आता महामेट्रो कंपनीत होण्यास सुरवात झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाचे रस्त्यावर काम सुरू होण्यापूर्वी सर्वेक्षण, भूगर्भाची तपासणी, मेट्रो मार्गाची निश्‍चिती आदी कामे नागपूरमध्येही करावी लागली होती. ते करताना येणाऱ्या अडचणी व त्याची प्रक्रिया या बाबतचा अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे पुण्यातही सुरवातीला त्याच यंत्रणेकडून कामे होतील. त्यामुळे ही व्यवस्था आणि यंत्रणा निर्माण करण्यासाठी वेळेत बचत होणार आहे. त्यामुळे पुण्याचे काम अल्पावधीत नागपूरपेक्षा वेगाने होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. वनाज-रामवाडी हा मार्ग पूर्णतः एलिव्हेटेड आहे, तर पिंपरी चिंचवड-स्वारगेट हा मार्ग काही प्रमाणात भुयारी आहे. एलिव्हेटेड मार्गाचे काम तीन वर्षांत होऊ शकते. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांची मुदत असली तरी तत्पूर्वीच ते पूर्ण करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

शिवाजीनगरमध्ये जंक्‍शन 
पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी मार्ग शिवाजीनगर धान्य गोदामाजवळ छेदणार आहेत. त्यामुळे तेथे जंक्‍शन होईल. शिवाजीनगर बस स्थानक त्या ठिकाणी हलविण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रोला अनुकूल शहरांतर्गत बस वाहतूक व्यवस्था असेल. बीआरटीचे काही मार्गही तेथून जातील. बालेवाडीमध्येही एकात्मिक वाहतूक व्यवस्था केंद्र उभारण्यात येणार आहे. शहरात प्रवेश करताना बीआरटी, बस, मेट्रोचे मार्ग आदी पर्याय तेथेच उपलब्ध होतील, असेही आयुक्तांनी सांगितले.  

टीडीआर धोरणानुसार भूसंपादन 
दोन्ही मेट्रो मार्गांसाठी एकूण ४४ हेक्‍टर जमिनीचे भसंपादन करावे लागणार आहे. त्यातील ३२ हेक्‍टर शासकीय जागा आहे. १२ हेक्‍टर खासगी जागा असून टीडीआर किंवा रोख स्वरूपातील भरपाई, यातून ते भूसंपादन होईल. मेट्रोसाठी ७० टक्के जागा शासकीय असल्यामुळे अडचण येणार नाही. तसेच नदीपात्रातील १. ७ किलोमीटरच्या मार्गाबाबत एनजीटीच्या आदेशानुसार कार्यवाही होणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. 

पुणे पब्लिक ट्रान्स्पोर्ट 
मेट्रोचे काम सुरू होतानाच शहरात एकात्मिक सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत, अशी माहिती कुणाल कुमार यांनी दिली. त्यात बीआरटी, शहरांतर्गत बस, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आदींचा समावेश असेल. पुणे पब्लिक ट्रान्स्पोर्ट, असा ब्रॅंड शहरात तयार करून परस्परपूरक वाहतूकव्यवस्था तयार करण्यात येत आहे. त्याचे काम दोन महिन्यांत सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

अशी असेल कंपनीची रचना 
महामेट्रो कंपनीत ११ संचालक असतील. नगर विकास खात्यातील सचिव अध्यक्ष असतील. त्यात केंद्राचे आणि राज्याचे प्रत्येकी पाच अधिकारी असतील. राज्याच्या अधिकाऱ्यांतून व्यवस्थापकीय संचालक नियुक्त होतील. त्या अधिकाऱ्यांत पुण्याच्या महापालिका आयुक्तांचाही पदसिद्ध संचालक म्हणून समावेश असेल. 

चार डब्यांतून १२५० प्रवासी 
एका मेट्रोमार्गावर इंजिनपाठोपाठ चार डबे असतील. त्यातून १२५० प्रवासी प्रवास करू शकतील. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) प्रवासीभाडे आकारण्याचा अंदाज व्यक्त केला असला, तरी २०२१ मधील परिस्थितीनुसार प्रवासीभाडे निश्‍चित होईल. ते करताना प्रवाशांचा विचार करूनच ते आकारण्यात येईल. 

मेट्रो मार्ग विस्तारणार
निगडी ते पिंपरी आणि स्वारगेट ते कात्रज, असा मेट्रो मार्ग विस्तारण्याची मागणी होत आहे, असे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी त्याचे स्वागत केले. पुणे मेट्रोचे काम सुरू झाल्यावर विस्तारित मार्गांचा प्रकल्प आराखडा तातडीने तयार करून महापालिका, राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. त्याला मंजुरी मिळाल्यावर मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण होऊ शकेल, असेही दीक्षित यांनी सांगितले. 

दोन महिन्यांत कर्ज 
पुणे मेट्रोसाठी ६३२५ कोटी रुपयांचे कर्ज जागतिक बॅंकेच्या माध्यमातून तत्त्वतः मंजूर झाले आहे. त्याबाबतची प्रशासकीय औपचारिकता पूर्ण करण्यासाठी जागतिक बॅंकेचे पथक १९ डिसेंबरला पुण्यात येत आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यावर दोन महिन्यांत कर्जासाठी करार करण्याची प्रक्रिया केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने पूर्ण होईल, असेही कुणाल कुमार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune metro project