
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकार्पण केल्यानंतर पुणे मेट्रो आजपासून सामान्य नागरिकांसाठी खुली झाली.
पुणे - फुलांनी सुशोभित केलेला स्थानकाचा परिसर... सातवर्षीय चिमुरडीपासून सत्तर वर्षांच्या आजींपर्यंत मेट्रोत (Metro) बसण्यासाठी आलेले उत्साही नागरिक अन् या नागरिकांच्या स्वागतासाठी सज्ज असलेले मेट्रोचे अधिकारी... (Officer) रविवारी दुपारी पुणे मेट्रोच्या (Pune Metro) पहिल्या फेरीपूर्वी गरवारे मेट्रो स्थानकात (Garware Metro Station) असे उत्साही वातावरण होते. ‘पुणे मेट्रोमध्ये आपले स्वागत आहे’, अशी उद्घोषणा होताच मेट्रोचा स्थानकात प्रवेश झाला आणि त्यासरशी नागरिकांनी एकच जल्लोष केला. ठीक तीन वाजता ‘गणपती बाऽप्पा मोरया’, ‘छत्रपती शिवाजी महाराज कीऽ जय’ या दमदार घोषणा देणाऱ्या उत्साही पुणेकरांसह मेट्रोने गरवारे स्थानकातून पहिल्या फेरीला प्रारंभ केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकार्पण केल्यानंतर पुणे मेट्रो आजपासून सामान्य नागरिकांसाठी खुली झाली. गरवारे ते वनाज स्थानकादरम्यानच्या टप्प्यावर मेट्रोचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दुपारी दोन वाजेपासूनच स्थानक परिसरात नागरिकांचे आगमन झाले. स्वयंचलित जिने, माहितीदर्शक फलक नागरिक कुतूहलाने पाहत होते. गरवारे स्थानक ते वनाज स्थानकादरम्यानच्या मेट्रोच्या पहिल्याच फेरीत सुमारे एक हजार नागरिकांनी प्रवास केला. प्रत्येक स्थानकावर मेट्रो थांबल्यावर प्रवेश करणाऱ्या नागरिकांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले जात होते. अनेकांनी सहकुटुंब प्रवासाचा आनंद घेतला. विशेष म्हणजे व्हिडिओ कॉलद्वारे इतर आप्तांनाही मेट्रोचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न काहींनी केला. ज्या शहरात लहानाचे मोठे झालो, त्याच पुण्यात मेट्रो सुरू झाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
गरवारे स्थानकात दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास मेट्रो दाखल झाली. मेट्रोत प्रवेश केल्यावर नागरिकांची सेल्फी घेण्यासाठी लगबग सुरू होती. ठीक तीन वाजता मेट्रोने गरवारे स्थानक सोडले. त्यानंतर नळस्टॉप, आयडियल कॉलनी आणि आनंदनगर अशी तीन स्थानके पार करत सुमारे दहा मिनिटांनी मेट्रो वनाज स्थानकात पोहोचली. दहा मिनिटांच्या थांब्यानंतर ही मेट्रो वनाज स्थानकावरून गरवारे स्थानकाकडे पुन्हा रवाना झाली. नऊशे लोकांची आसनक्षमता असलेली मेट्रो पहिल्याच फेरीत तुडूंब भरली होती.
नागरिकांचा सळसळता उत्साह
पुणे मेट्रोच्या पहिल्या फेरीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी उत्साहाने गर्दी केली होती. सहकुटुंब आलेल्या काही परिवारांनी आजचा हा दिवस खास मेट्रोसाठी राखून ठेवल्याचे सांगितले, तर अनेकांनी मेट्रोत बसण्यासाठी दुपारचे जेवण लवकर करून स्थानकाकडे धाव घेतल्याचे सांगितले. एक व्यक्ती तर मेट्रोत बसण्यासाठी खास सांगलीहून आली होती.
व्हिडिओ कॉल करून दाखविला मेट्रोतील प्रवास...
मेट्रो सुरू होण्याची पुणेकर आतुरतेने वाट पाहत होते. परंतु, फक्त पुणेकरच नाही तर मेट्रोची उत्सुकता इतर जिल्ह्यांतील लोकांनादेखील वाटत होती. मेट्रो सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी प्रवास करण्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. प्रवाशांनी पुण्यातील आणि पुण्याबाहेरील नातेवाइकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मेट्रोतील वातावरणाचे दृश्य दाखवून व प्रवासातील मज्जा सांगून आनंद व्यक्त केला.
असा करा मेट्रोने प्रवास....
रस्त्याच्या बाजूला मेट्रो स्टेशनवर जाण्यासाठी जिन्यांची व्यवस्था
प्रवेशद्वाराने वर गेल्यावर लगेचच तिकीटघर
महामेट्रोचे Pune Metro या ॲपद्वारेही ऑनलाइन तिकीट बुक करता येते
तिकीट मिळाल्यानंतर स्टेशनच्या दुसऱ्या मजल्यावरील प्लॅटफॉर्मवर जायचे आहे
यासाठी तिकिटावरील क्यूआरकोड स्कॅन करत बॅरिकेट्स खुले होतात
प्रत्येक स्टेशनवर दोन प्लॅटफॉर्म असून आपली गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे, हे पाहूनच जिना चढा
प्लॅटफॉर्मवरील पिवळ्या रेषेच्या मागे थांबा
मेट्रो आल्यावर दरवाजे खुले होतात. आतील प्रवासी बाहेर आल्यावर मेट्रोत चढा
मेट्रोची वैशिष्ट्ये...
प्रवाशांसाठी स्थानकातील सुविधा
पार्किंग, चार्जिंग स्टेशन, ई-बाइकची सुविधा
सरकते जिने आणि उदवाहकाची व्यवस्था
फलकांसह घोषणा प्रणाली
सार्वजनिक प्रसाधनगृहे, बेबी केअर रूम
दिव्यांगांसाठी आवश्यक ती व्यवस्था
सुरक्षेसाठी धातुशोधक प्रणाली आणि सामानासाठी एक्स-रे प्रणाली
प्रत्यक्ष मेट्रोतील सुविधा
दिव्यांगांसाठी व्हीलचेअर सहज वापरा येते
स्टेशनची माहिती देणारे डिजिटल फलक
आणीबाणीच्या स्थितीत संवादासाठी प्रत्येक डब्यात चार युनिट
डब्याच्या दोन्ही बाजूला चार्जिंगची व्यवस्था
रुंद प्रवेशद्वार
हे करा
मास्क घालून, तिकीटासह प्रवास करा
उद्घोषणा काळजी पुर्वक ऐका
चढता-उतरताना काळजी घ्या
लहान मुलांची काळजी घ्या
मेट्रोत उभे राहताना हॅंडल घट्ट पकडा
प्रवाशांना आधी बाहेर पडू द्या, मग चढा
प्लॅटफॉर्मवर सुरक्षितपणे उभे रहा
हे करू नका
पाळीव प्राण्यांना सोबत घेऊ नका
मेट्रोमध्ये चढताना घाई करू नका
मेट्रो धावत असताना दरवाजा उघडण्यास भाग पाडू नका
रेलींगवर झुकू नका
दार बंद होत असताना मध्येच हात घालू नका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.