पुण्याच्या वाहतुकीसंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण, उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाऐवजी सार्वजनिक वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर उभारावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. हायपरलूपचा प्रकल्प गुंडाळण्याचेही संकेत त्यांनी दिले.

पुणे  ः पुण्याच्या वाहतुकीसंदर्भात शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण, उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाऐवजी सार्वजनिक वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर उभारावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. हायपरलूपचा प्रकल्प गुंडाळण्याचेही संकेत त्यांनी दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हडपसर ते स्वारगेट नवीन मेट्रो मार्ग
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर आणि महामेट्रोने हाती घेतलेल्या वनाज ते रामवाडी व पिंपरी ते स्वारगेट या मार्गांचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय अजित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. तसेच हडपसर ते स्वारगेट हा नवीन मेट्रो मार्ग सुरू होणार आहे.  

हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गाचा शिवाजीनगर ते शेवाळेवाडीपर्यंत विस्तार करण्याची सूचना पवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिली  होती, तोच मार्ग पुढे लोणी काळभोरपर्यंत विस्तारण्यासंदर्भात नियोजन करण्याची सूचना पवार यांनी आज ‘पीएमआरडीए’ला दिली. 

महामेट्रोने हाती घेतलेला वनाज ते रामवाडी मेट्रो प्रकल्प चांदणी चौक ते वाघोलीपर्यंत वाढवावा, पिंपरीं- चिंचवड मेट्रो मार्ग निगडी ते चाकणपर्यंत वाढवावा, पिंपरीवरून स्वारगेटपर्यंत येणारा मार्ग कात्रजपर्यंत वाढवावा, तसेच हडपसर ते स्वारगेट आणि हडपसर ते शिवाजीनगर हे दोन मार्ग नव्याने निश्‍चित करून घ्यावेत, अशा सूचना पवार यांनी दिल्या. या प्रकल्पांचा विस्तार करण्यासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपये लागणार आहेत, त्यापैकी राज्य सरकारच्या हिश्‍शाची वीस टक्के रक्‍कम शासनाकडून उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन बैठकीत पवार यांनी दिले. 

महामेट्रो आणि ‘पीएमआरडीए’ने हाती घेतलेल्या मेट्रो प्रकल्पांचा आढावा पवार यांनी घेतला. या वेळी खासदार अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, महानगर नियोजनकार विवेक खरवडकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. 

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
- मेट्रो प्रकल्पांचे विस्तारीकरण करणे
- मेट्रो प्रकल्पासाठी शासनाचा २० टक्के हिस्सा देण्यास मान्यता
- नवीन मेट्रो मार्ग ‘पीपीपी’ तत्त्वावर उभारणार
- राजीव गांधी आणि कामगार पुतळा येथील ५१८ झोपड्यांचे ‘एसआरए’मध्ये पुनर्वसन
- स्वारगेट ते कात्रज भुयारी मार्गासाठी, तसेच निगडी ते पिंपरी मेट्रोसाठी राज्य सरकार मदत करणार
- मेट्रो प्रकल्पाच्या कामातून निघणारा राडारोडा टाकण्यासाठी स्वतंत्र आराखडा करणार

असा होणार मेट्रो मार्गांचा विस्तार
- स्वारगेट ते कात्रज
- पिंपरी ते निगडी
- रामवाडी ते वाघोली
- वनाज ते चांदणी चौक
- शिवाजीनगर ते लोणी काळभोर  

‘पुणे- पिंपरी-चिंचवड मेट्रो प्रकल्प’ 

महामेट्रोने हाती घेतलेल्या पिंपरी ते स्वारगेट या मेट्रो प्रकल्पाचे नामकरण ‘पुणे मेट्रो’ असे केले होते, त्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी नावात बदल करून ‘पुणे- पिंपरी-चिंचवड मेट्रो प्रकल्प’ करावे, अशी मागणी केली होती. ती पवार यांनी मान्य करीत नाव बदलण्याच्या सूचना महामेट्रोला दिल्या.

वर्तुळाकार मार्गाऐवजी ग्रीन कॉरिडॉर 
उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) उभारण्याऐवजी केवळ सार्वजनिक वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर उभारावा, त्यावर ‘मेट्रो निओ’ राबविता येईल का, याची चाचपणी करावी, अशी सूचना अजित पवार यांनी शुक्रवारी पुणे महापालिकेला केली. त्यामुळे ‘एचसीएमटीआर’वर सहा ते आठ हजार कोटी रुपये होणारा खर्च ‘मेट्रो निओ’मुळे दोन ते सव्वा दोन हजार कोटी रुपयांपर्यंत कमी होण्यास मदत होणार आहे. महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी पवार यांनी ही  सूचना  दिली. 

या वेळी महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांच्यासह इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘मेट्रो निओ’च्या पर्यायावर विचार करून, त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविल्यास त्याला मान्यता देण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले. 

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘एचसीएमटीआर’वर सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांकडून केली जात होती, त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनीच नाशिकच्या धर्तीवर या मार्गावर मेट्रो निओचा प्रकल्प राबविता येऊ शकतो, असा प्रस्ताव मांडला. मेट्रो निओसाठी प्रतिकिलोमीटर पन्नास कोटी रुपये खर्च येतो, त्यामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर त्याचा फार मोठा ताण येणार नाही, अशी भूमिका मांडण्यात आली. उपमुख्यमंत्री पवार यांनी या प्रस्तावाच्या दृष्टीने अनुकूलता दर्शवीत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्याच्या सूचना केल्या.

एकावेळी १५ हजार प्रवासी
पहिल्या टप्प्यात या मार्गावर ‘मेट्रो निओ’ केल्यास १५ ते १७ हजार प्रवासी एकाचवेळी प्रवास करतील. गरज वाटल्यास आणि प्रवासीसंख्या वाढल्यास दररोज पन्नास हजारांपर्यंत प्रवासी वाहून नेता येतील, अशी ट्रामसेवादेखील या मार्गावर करता येऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Metro will expand