

पुणे, ता. २ : म्हाडाच्या चार हजार ४६२ सदनिकांच्या सोडतीसाठी अर्जांचा पाऊस पडला आहे. आतापर्यंत ९७ हजार ७०१ अर्ज म्हाडाला प्राप्त झाले आहेत. कागदपत्रांच्या ऑनलाइन पडताळणीला विलंब होत असल्याने अर्ज करण्याची मुदत एक महिन्याने वाढविली आहे. त्यामुळे इच्छुकांना आता १५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
दाखल झालेल्या अर्जांपैकी ५२ हजार २७६ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. अर्ज प्रक्रियेतून एकूण एक कोटी ६२ लाख ९३ हजार ५३२ रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. म्हाडातर्फे १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनांतील सदनिकांच्या वितरणासाठी अर्ज सादर करण्याची मूळ मुदत १५ सप्टेंबर होती, ती वाढविण्यात आली आहे. अर्जासाठी मुदत असल्याने काही अर्जदारांनी अजून अनामत रक्कम भरलेली नाही. मात्र, मुदतीपर्यंत अनामत रकमेत वाढ होईल, अशी माहिती मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.
या सोडतीतील एकूण चार हजार ४६२ सदनिकांपैकी २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत दोन हजार ९७१, तर १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेंतर्गत एक हजार ४९१ सदनिका उपलब्ध आहेत. पुणे महापालिका हद्दीत एक हजार ४६८, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत एक हजार ४०६ आणि ‘पीएमआरडीए’ क्षेत्रात एक हजार ५८८ सदनिकांचा समावेश आहे.
सोडत २६ नोव्हेंबरला :
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली असली तरी, अर्जदारांना अनामत रक्कम त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, तर ‘आरटीजीएस’ अथवा ‘एनईएफटी’द्वारे १६ ऑक्टोबरला दुपारी तीनपर्यंत भरता येईल. स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी १२ नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध होईल. त्यावर १४ नोव्हेंबरला सायंकाळी पाचपर्यंत दावे-हरकती नोंदविता येणार आहेत. स्वीकृत अर्जांची अंतिम यादी २० नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता जाहीर केली जाईल. सदनिकांची सोडत २६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता काढण्यात येणार असून, यशस्वी अर्जदारांची नावे त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.