भाजपने या निवडणुकीला हुकूमशाहीकडे नेले - रविंद्र धंगेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ravindra dhangekar

'कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. हे भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडले नाही आणि भाजपला शोभणारे नाही. हि निवडणूकी हुकूमशाहीकडे नेण्याचे काम भाजपने केले.'

MLA Ravindra Dhangekar : भाजपने या निवडणुकीला हुकूमशाहीकडे नेले

पुणे - 'कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. हे भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडले नाही आणि भाजपला शोभणारे नाही. हि निवडणूकी हुकूमशाहीकडे नेण्याचे काम भाजपने केले.' अशा शब्दात भाजपवर टिका करीत महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी 'कसब्याचा विजय हा महाविकास आघाडीच्या भविष्यातील विजयाची नांदी ठरेल.' असा विश्‍वासही व्यक्त केला.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी विजय मिळविल्यानंतर राष्ट्रवादी भवनामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते धंगेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे मोहन जोशी, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) संजय मोरे, गजानन थरकुडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख उपस्थित होते.यावेळी निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारांबाबत धंगेकर म्हणाले, 'कसब्यात अक्षरशः पैशांचा धूर निघाला, त्याचा फटका भाजप व देवेंद्र फडणवीस यांना बसला. भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पैशांचे राजकारण मुळीच आवडले नाही. हा प्रकार भाजपसारख्या पक्षाला शोभणारा नाही. हि निवडणुक चुकीच्या पद्धतीने लढविली गेली.'

धंगेकर म्हणाले, 'महाविकास आघाडी व सर्व घटक पक्षांनी आम्हाला चांगली मदत केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून रात्रंदिवस आमच्यासाठी काम केल्याचे मी जवळून बघितले आहे. प्रशांत जगताप यांनी तर हि निवडणुक स्वतःचीच असल्याप्रमाणे निवडणुक त्यांच्या हातात घेतली होती. घरातील उमेदवार असल्याप्रमाणे ते झटले. मोहन जोशी यांनी तर पक्षाकडून उमेदवारी मिळण्यापासून ते विजय साकारण्यापर्यंत वडीलकीच्या नात्याने काळजी घेतली. तर माझ्या विजयाचा मार्ग सुकर करण्याचे काम सर्व शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी आणि आदित्य ठाकरे यांच्या एका सभेने केले. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद आणि सरकार पाडण्याचा राग मतदारांच्या मनात होता, तो आज मतदानातून व्यक्त झाला.'

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबद्दल धंगेकर म्हणाले, 'शरद पवार यांनी माझ्यासाठी तीनदा प्रचारात सहभाग घेतला. त्यांनी व्यापारी, खेळाडू, अल्पसंख्यांक समुदायाचे मेळावे घेऊन मला मोठी ताकद दिली. अजित पवार यांनीही माझ्या विजयासाठी बारकाईने लक्ष दिले. एवढेच नव्हे, तर माध्यामांना बाईट देताना सावकाश दे, अति घाई करुन नकोस, असा प्रेमळ सल्लाही दिला.'

मी ही बारामतीचाच! बापटांनाही भेटणार - धंगेकर

मी मुळचा बारामतीमधीलच आहे, माझा जन्म बारामतीमध्ये झाला आहे. पवार साहेबांचे वर्षानुवर्षे काम पाहत आम्ही मोठे झालो आहोत. पवार कुटुंबीयांनी मला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य, त्यांचा मुलगा म्हणूनच कायम वागणुक दिली आहे. गिरीश बापट हे पुण्याचे मोठे नेते आहेत. त्यांना नक्कीच भेटणार आहे. याबरोबरच टिळकवाडा, शिवसेना कार्यालय या ठिकाणी जाणार असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.